Kolhapur- चेष्टा जिवावर बेतली; विहिरीत ढकललेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:54 IST2025-03-20T11:52:28+5:302025-03-20T11:54:33+5:30
युवकावर गुन्हा दाखल

Kolhapur- चेष्टा जिवावर बेतली; विहिरीत ढकललेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
गारगोटी : येथील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पाण्यात ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तानाजी भागोजी बाजारी (वय १८, मूळ रा. धनगरवाडा - फये, सध्या रा. डॉ. आंबेडकर शासकीय वस्तिगृह, गारगोटी, ता. भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
चेष्टेने पाण्यात ढकलल्याप्रकरणी रोहित सुतार (रा. गारगोटी, ता. भुदरगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृताचे चुलते सोनबा बिरू बाजारी यांनी गारगोटी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तानाजी बाजारी हा शिक्षणानिमित्त गारगोटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहतो. बुधवारी रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने दुपारी अडीचच्या सुमारास डी.के. देसाई यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धूत होता. त्यावेळी रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेल्या रोहित सुतार याने तानाजी बाजारी याला “काठावर बसून कपडे कसली धुतोस, विहिरीत उडी मार,” असे म्हणून चेष्टा-मस्करीत पाण्यात ढकलले. तानाजीला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी त्यास तातडीने बाहेर काढण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. मृत युवक विहिरीत पडल्याचे समजताच नातेवाइकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. अथक परिश्रमाने गारगोटी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रणजित सोरटे यांनी मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
अभ्यासात होता हुशार
तानाजी बाजारी हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्याने बालपणापासून गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या अमरनाथ कांबळे या वसतिगृहात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाहू कुमार भवन प्रशालेतून त्याने दहावीला ९२ टक्के गुण मिळविले होते. येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीअरिंग (आयसीआरई)मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात तो शिकत होता. गेल्याच महिन्यात झालेल्या पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये त्याने ९० टक्के गुण मिळविले होते. त्याच्या पश्चात आई, वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे.