शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा विद्यार्थी राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:46 PM2019-06-20T14:46:35+5:302019-06-20T14:48:50+5:30
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९७३ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यासह महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९७३ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यासह महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सिद्ध केला आहे. यासह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये महानगरपालिकेच्या ३३ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे. पीयूषच्या यशाबद्दल मान्यवरांनी शाळेत जाऊन त्याचा सत्कार केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, उपसभापती सचिन पाटील, शिक्षण समितीचे सदस्य संजय मोहिते, श्रावण फडतारे, सुनील पाटील, रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्राथमिक शिक्षण समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले विद्यार्थी
पीयूष सचिन कुंभार (प्रथम, म्युनि. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), प्रसन्ना जनार्दन ओंकार (पाचवा, नेहरूनगर विद्यामंदिर), श्रद्धा गणपत सुतार (पाचवा, म्युनि. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), सार्थक सुभाष माने (दहावा, नेहरूनगर विद्यामंदिर), साची सचिन शिंदे (बारावी), आत्रेय राजेश शेेंडे (बारावा), शार्दूल रघुनाथ कांबळे (पंधरावा), शरयू मनोहर शिंगाडे, ऋषिकेश किशोर पाटील, सुमेध सच्चिदानंद जिल्हेदार (तिघेपण राज्यात अठरावे) हे सर्व विद्यार्थी म्युनि. श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे आहेत.
पीयूष पहिल्यापासूनच अव्वल
पीयूषचे वडील सचिन कुंभार व आई पुष्पा कुंभार हे दोघेपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पीयूष पहिलीपासूनच महानगरपालिकेच्या जरगनगर विद्यालयात शिक्षण घेत आहे. पहिल्यापासून तो विविध स्पर्धा परीक्षांना बसत होता. त्यामुळे त्याला विविध स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी आत्मविश्वास वाढला होता. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत तो अभ्यास करत होता. यासह तो स्केटिंग आणि स्विमिंग स्पर्धेतही अव्वल आहे. त्याला शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरव, शिक्षक सुनील पाटील, संतोष कांबळे, युवराज एरुडकर, जोतिबा जाधव, स्वाती ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
आई - वडील व वर्गशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळविले आहे. मनावर कोणतेही दडपण घेता मी या परीक्षेला सामोरा गेलो होतो.
- पीयूष कुंभार
प्राथमिक शिक्षण समिती व महानगरपालिकेच्या शाळांनी केलेल्या विशेष उपक्रम राबविलेने महानगरपालिकेच्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होऊ लागले आहेत. युनिट टेस्ट, सराव चाचण्या, शिष्यवृत्तीविषयक सहा दिवसांचे मार्गदर्शन शिबिर, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्ती धर्तीवर मॉडेल पेपरचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतल्याने विद्यार्थ्यांना हे यश मिळविणे शक्य झाले आहे.
शंकर यादव,
प्रशासनाधिकारी
चौथीची परीक्षा संपल्यानंतर शाळेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू केली जाते. वर्षभराचे आमचे वेळापत्रक तयार केले जाते. एक दिवसही सुट्टी न घेता आमचे शिक्षक अध्यापनाचे काम करतात. सर्वांनी एकत्र घेतलेल्या परिश्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हे यश मिळाले आहे.
उत्तम गुरव,
मुख्याध्यापक, श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर