विद्यार्थिनी उपस्थित भत्त्याच्या प्रतीक्षेत
By admin | Published: December 26, 2014 11:41 PM2014-12-26T23:41:29+5:302014-12-26T23:45:03+5:30
सव्वा पाच हजार मुली : पहिली ते चौथीसाठी प्रतिदिन एक रुपया; गळती थांबवण्यासाठी प्रयत्न
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -दारिद्र्यरेषेखालील खुल्या गटातील आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी ‘उपस्थित भत्त्या’च्या प्रतीक्षेत आहेत. निम्मे शैक्षणिक वर्ष सरले तरी जिल्ह्यातील सुमारे ५ हजार २८० मुलींना भत्ता मिळालेला नाही. या मुलींना प्रतिदिन एक रुपयाप्रमाणे ‘उपस्थित भत्ता’मिळतो.
नियमित शाळेला उपस्थित राहण्याची सवय लागावी, मागास व दुर्बल घटकांतील मुलीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात, म्हणून शासनाच्या शिक्षण विभागाकडून गेल्या दहा वर्षांपासून उपस्थित भत्ता दिला जातो. प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या गरीब, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुली प्रत्येक दिवसाला एक रुपयाच्या प्रोत्साहनपर भत्त्यासाठी पात्र आहेत. यासाठी विद्यार्थीनींनी वर्गात ७५ टक्केपेक्षा अधिक उपस्थित असणे बंधनकारक आहे.
दारिद्र्यामुळे पालक शिक्षण घेण्याच्या वयातच मुलांना कामाला जुंपतात. परिणामी, मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक मुले वारंवार गैरहजर राहिल्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. यामुळे पालकांना अल्प प्रमाणात का असेना, आर्थिक हातभार लागावा, गळती थांबून मुली रोज शाळेला येण्याची गोडी लागावी म्हणून भत्ता दिला जातो.
प्रत्येक महिन्याच्या शेवटी भत्ता मिळावा, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, शासन भत्त्याची रक्कम जिल्हा पातळीवर वेळेत पाठवित नाही. शिक्षण विभागाकडून पाठपुरावा केला तरी गांभीर्याने घेतले जात नाही. तसेच वेळेत भत्ता मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुरावा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी भत्ता मिळण्यास विलंबच होत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्यांनतर सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार या प्रमुख कारणांमुळे भत्त्यासाठी यंदा अधिकच विलंब झाला आहे.
निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी जिल्हा पातळीवरील शिक्षण प्रशासनाला भत्त्याची रक्कम कधी मिळणार, याची अजून तरी नेमकेपणाने माहिती नाही. मुलींचे पालक संंबंधित शाळेतील मुख्याध्यापकांकडे चौकशी करीत आहेत. मुख्याध्यापकही शासनाकडे बोट दाखवत, शासनाकडून आल्यानंतर भत्ता दिला जाईल, असे मोघम उत्तर देत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून भत्ता त्वरित द्यावा, अशी मागणी होत आहे.
तालुकानिहाय पात्र मुली
आजरा-१६५,
गगनबावडा-४४,
भुदरगड-२११,
चंदगड-२३३,
गडहिंग्लज-३७१,
हातकणंगले-१२३३,
कागल-२५९,
करवीर-७७४,
पन्हाळा-३३२,
राधानगरी-४२०,
शाहूवाडी-४२८,
शिरोळ-८१३.
भत्ता म्हणून जिल्ह्यासाठी सुमारे साडेचार लाखाची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत पैसे शिक्षण विभागाकडे येतात. निधीची प्रतीक्षा आहे.
- ए. जी. मगदूम,
प्राथमिक उपशिक्षणाधिकारी