मदतीसाठी धावले विद्यार्थी कामगार मंडळ
By admin | Published: November 18, 2014 10:57 PM2014-11-18T22:57:55+5:302014-11-18T23:22:09+5:30
कपडे या ठिकाणी जमा करा...
कोल्हापूर : शहरातील झोपड्यांमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मांडल्यानंतर चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ वाढत आहे. आज, मंगळवारी शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष सचिन वणिरे म्हणाले, आमचे मंडळही अशा विधायक कार्यांत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही वार्ताफलकांद्वारे रविवारपर्यंत कपडे देण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना केले आहे. त्याचसोबत मंडळाच्या गणेशोत्सव वर्गणीतून नवीन कपडे व ब्लॅँकेट खरेदी करून या मुलांना मदत करणार आहे. या चिमुकल्यांच्या मदतीसाठी ‘अवनि’ संस्था सरसावली आहे. वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोणाला या चिमुकल्यांसाठी मदत करावयाची असेल, तर त्यांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ ९९२२४३८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कपडे या ठिकाणी जमा करा...
दानशूर कोल्हापूरकरांनी कपडे भाऊसिंगजी रोडवर असलेल्या नेता स्टोअर्ससमोरील जाधववाडा येथील ‘एकटी’ संस्थेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत जमा करावेत. त्यासाठी ८८०५२३६३१६ अथवा ९८८१३२०९४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.