पारदर्शकता नसेल तर ‘नेट’ परीक्षा घेताच कशाला?, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:04 PM2024-06-21T16:04:41+5:302024-06-21T16:05:29+5:30
परीक्षा रद्द केल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय
कोल्हापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. एकतर ‘नीट’चा घोळ अद्याप सुरूच असताना आता ‘ने”मध्येही गैरप्रकार आढळून आल्याने विद्यार्थी कमालीचे नाराज झाले. परीक्षांमध्ये पारदर्शकता ठेवता येत नसेल तर अशा परीक्षा घेताच कशाला? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) मंगळवारी (दि. १८) यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना शंभर शंभर कि.मी. दूर परीक्षा केंद्र मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. परिणामी, जिल्ह्यात ८५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल सायबर सिक्युरिटीकडून देण्यात आल्याने खळबळ उडाली.
‘यूजीसी’ने याची दखल घेत परीक्षाच रद्द केली. मात्र, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नेटसाठी वर्ष-वर्ष तयारी करून अनेक विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र, यात पारदर्शकता नसेल तर आम्ही परीक्षा द्यायच्याच कशासाठी? असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक हाेण्यासाठी ‘नेट’ अनिवार्य आहे. शिवाय, पीएच.डी.साठी प्रवेश मिळवण्यासाठी ‘नेट’ची गरज भासते.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाच चुकीच्या
या परीक्षेत हिंदी विषयाच्या विद्यार्थ्याला उर्दूची प्रश्नपत्रिका, तर इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी इंग्रजीची प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी थेट ‘यूजीसी’कडे मेलद्वारे तक्रार केली आहे.
नेट परीक्षेचे व्यवस्थापन नीट करता येत नसेल तर परीक्षा घेता कशाला? परीक्षेचे सेंटर ८०-८० किलोमीटर दूर असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे टाळले. दोन सत्रांत परीक्षा, त्यात केंद्र दूर यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. - डॉ. प्रवीण कोडोलीकर, परीक्षार्थी, कोल्हापूर.
खूप मेहनत करून अनेक विद्यार्थी ‘नेट’ची परीक्षा देत असतात. मात्र, गैरप्रकारामुळे या परीक्षेबद्दलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परीक्षा पूर्णत: पारदर्शकपणे घ्यावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. - प्रा. डॉ. आर. एल. निर्मळे-चौगुले, प्राचार्य, अशोकराव माने बी.एड.कॉलेज, पेठवडगाव.