बीजगणितमधील चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळात
By admin | Published: March 12, 2016 12:26 AM2016-03-12T00:26:21+5:302016-03-12T00:33:56+5:30
दहावीची परीक्षा : शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी
कोल्हापूर : दहावीच्या बीजगणित पेपरमधील काठिण्य पातळी अधिक असलेल्या व चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांतून होत आहे.
दहावीच्या परीक्षेत मंगळवारी (दि. ८) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत बीजगणित या विषयाचा पेपर झाला. यातील प्रश्न क्रमांक पाचमधील उपप्रश्न एक आणि तीन हे खूपच वेळ घेणारे आणि अवघड होते. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांची काठिण्यपातळी खूपच जास्त होती. शिवाय उपप्रश्न क्रमांक तीन हा पाठ्यपुस्तकाबाहेरील होता. हा प्रश्न ‘एक तीन अंकी संख्या आहे. जी तिन्ही अंकांच्या बेरजेपेक्षा १७ पट आहे. जर १९८ ही संख्या दिलेल्या तीन अंकी संख्येत मिळविल्यास अंकांची अदलाबदली होते’, अशा स्वरूपाचा होता. मात्र, यात कोणत्या अंकांची अदलाबदली होते, हे स्पष्ट केले नसल्याने तसेच हा प्रश्न अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे त्यांना संबंधित प्रश्न नीट सोडविता आलेला नसल्याचे या विषयातील काही शिक्षकांनी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात पेपर झाल्यानंतर दूरध्वनीवरून माहिती दिली.
विद्यार्थीहित लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा सकारात्मक निर्णय शिक्षण मंडळाने घ्यावा. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सरसकट दहा गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक, पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
प्रश्न बरोबरच : गोसावी
शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म् हणाले, बीजगणिताचा पेपर झाल्यानंतर संबंधित प्रश्नाची कल्पना विभागीय मंडळाला दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार पुण्यातील नियामक मंडळाशी मी संपर्क साधला. त्यांनी प्रश्न बरोबर असल्याचे सांगितले आहे.