पुस्तकांविना विद्यार्थ्यांना बनले ‘दूर’ शिक्षण

By Admin | Published: November 6, 2014 12:24 AM2014-11-06T00:24:18+5:302014-11-06T00:40:07+5:30

केंद्रांकडून ‘शिक्का’वजा उत्तरे : एम. कॉम., एम. ए.चे विद्यार्थी हवालदिल

The students became 'distant' teaching without books | पुस्तकांविना विद्यार्थ्यांना बनले ‘दूर’ शिक्षण

पुस्तकांविना विद्यार्थ्यांना बनले ‘दूर’ शिक्षण

googlenewsNext

संतोष मिठारी - कोल्हापूर --परीक्षा पाच ते सहा दिवसांवर आली असताना ‘पुस्तके नाहीत, विद्यापीठातून घ्या,’ अशी ‘शिक्का’वजा उत्तरे दूरशिक्षण अभ्यास केंद्रांमधून मिळत असल्याने एम. कॉम., एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील सुमारे तीन हजार बहि:स्थ विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
एम. कॉम. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच एम. ए. (राज्यशास्त्र) भाग एकच्या स्वयंअध्ययनाच्या पुस्तकांत काही चुका असल्याने त्याचे वितरण थांबविले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून दोन सत्रातील स्वयंअध्ययनासाठीच्या आठ पुस्तकांचे साधारणत: दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत शुल्कदेखील घेण्यात आले. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांकडून पुस्तकांबाबत ‘दूरशिक्षण’च्या केंद्रांकडे विचारणा झाली. त्यावर त्यांना पुस्तके दिली जातील, असे सांगण्यात आले. मात्र, आता पाच ते सहा दिवसांवर परीक्षा आलेली असताना अचानक कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ‘दूरशिक्षण’च्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी पुस्तकांची चौकशी केली असता, त्यांना उपलब्ध असलेली दोन ते तीन पुस्तके देऊन, उर्वरित पुस्तकांबाबत प्रवेश शुल्काच्या पावतीवर ‘पुस्तके नाहीत; विद्यापीठातून घ्या,’ अशा शिक्का मारून त्यांना उत्तरे दिली जात आहेत. संबंधित विद्यार्थी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रात आले असता त्यांना ‘तुमचे पुस्तकांचे पैसे परत दिले जातील, पुस्तके संकेतस्थळावरून ‘डाउनलोड’ करून घ्या,’ असा सल्ला दिला जात आहे. वर्षभर ताटकळत ठेवून ऐन परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाऐवजी पुस्तके मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी धावपळ त्रासदायक ठरणारी आहे. दरम्यान, पुस्तकांची छपाई जशी होईल, तशी ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. जी पुस्तके मिळणारच नाहीत, ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवली असल्याचे दूरशिक्षण केंद्राचे संचालक अरुण भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, एम. कॉम. भाग १ ची चार पुस्तके दिली असून उर्वरित संकेतस्थळावर आहेत. एम. ए. राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील चुकांमुळे त्यांच्या वितरणावर विद्यापीठाने बंधन घातले आहे. त्यामुळे त्यांचे पैसे परत दिले जात आहेत.
‘दूरशिक्षण’चा गोंधळ का?
राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये एखाद्या विद्याशाखेचा अभ्यासक्रम बदलल्यास त्याची अंमलबजावणी एक वर्षानंतर केली जाते. मात्र, शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रम बदलल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचवर्षी त्यानुसार कार्यवाही केली जाते. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमाचे स्वयंअध्यनासाठीच्या साहित्य, पुस्तके तयार होण्यास विलंब लागतो. शिवाय हे साहित्य, पुस्तकांसाठी लिखाण करणारे प्राध्यापक अन्य ठिकाणी सेवेत असतात. शैक्षणिक कामकाज उरकून त्यांना ‘दूरशिक्षण’च्या साहित्य, पुस्तकांचे लिखाण करावे लागते.


परीक्षा पुढे ढकला
वर्षभर प्रतीक्षा करायला लावून आठवड्यावर परीक्षा आली असताना स्वयंअध्ययन साहित्य, पुस्तके नाहीत असे दूरशिक्षण विभागाकडून सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. नोट्स उपलब्ध करून तयारी करण्यासाठी विद्यापीठाने एम. कॉम., एम. ए. (राज्यशास्त्र) भाग एकच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात.
- पंकज गडकरी (शहरमंत्री,अभाविप)

संकेतस्थळावर पुस्तके
दूरशिक्षण विभागाने बी. ए. द्वितीय वर्षातील मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आदी अभ्यासक्रमांची २२, बी.ए. भाग एकची २५, भाग तीनची १८, बी.कॉम भाग एक आणि दोनची १२, एम. ए. भाग एक आणि दोनची २१, एम. एस्सीची (मॅथ्स्) दहा, तर छपाई झाली नसलेली एम. कॉम. भाग एकची अ‍ॅडव्हॉन्स् अकौंटन्सी पेपर एक व दोन, मॅनेजमेंट कन्सेप्ट, आॅर्गनायझेशनल बिव्हेवर ही पुस्तके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.५

Web Title: The students became 'distant' teaching without books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.