दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमुळे बीएडचे विद्यार्थी गोंधळले
By admin | Published: April 21, 2015 12:02 AM2015-04-21T00:02:10+5:302015-04-21T00:33:30+5:30
बी.एड. शाखेच्या परीक्षेत सोमवारी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थी गोेंधळले होते.
भोंगळ कारभार : आठ केंद्रांवर ८६९ विद्यार्थी
अमरावती : बी.एड. शाखेच्या परीक्षेत सोमवारी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थी गोेंधळले होते. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर ८६९ विद्यार्थी पहिल्या पेपरपासून वंचित राहिले. चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्याने पुन्हा एकदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अमरावती विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयातील बी.एड. शाखेच्या परीक्षा २० एप्रिल ते ७ मे पर्यंत घेण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता उद्योनमुखी भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण विषयाचा पेपर होता. त्याकरिता विविध केंद्रावर ८.४५ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, काही वेळातच प्रश्नपत्रिका २३ एप्रिल रोजीच्या शैक्षणिक मानस शास्त्राचा असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. वर्ग खोलीत बसलेले विद्यार्थी एकमेकांकडे विचारणा करुन लागले होते. तत्काळ ही बाब काही विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ पेपरचे लिफाफे तपासले असता त्यावरही दोन्ही विषय नमूद असल्याचे आढळून आले. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी तत्काळ विद्यापीठाशी संपर्क केला होता. चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे सर्व विद्यार्थ्यांनी पेपर न सोडविता वर्ग खोल्यांतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याने एकच गोंधळ उडाला. शहरातील डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील दोन्ही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.