विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी नाहीच, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:17 PM2018-08-17T15:17:09+5:302018-08-17T15:22:21+5:30
विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिकचा वापर केला जात नाही. केवळ प्राध्यापक, कर्मचाºयांसाठी ही प्रणाली वापरली जात आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिकचा वापर केला जात नाही. केवळ प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली वापरली जात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सवलती, शिष्यवृत्तीचे लाभ विद्यार्थ्यांना मिळतात. अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठ, महाविद्यालयांमधील खरी अनुपस्थिती समजावी. परीक्षा देण्यासाठी किमान ७५ टक्के हजेरी असणे विद्यापीठाकडून बंधनकारक आहे.
सध्या बहुतांश महाविद्यालयांत तासिकानिहाय विद्यार्थ्यांची हजेरी प्राध्यापक नोंद करून घेतात. काही महाविद्यालयांमध्ये हजेरीच्या यादीवर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये अनेकदा फेरफार होण्याची अधिकतर शक्यता असते.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीची खरी आणि अचूक माहिती मिळावी यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याची सूचना सरकारने केली आहे; पण अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता बहुतांश महाविद्यालयांमध्ये संबंधित प्रणाली वापरली जात नाही. हजेरीतील फेरफार आणि हस्तक्षेप टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिकचा वापर होणे आवश्यक आहे.
विद्यापीठातील तीन विभागांतच सुविधा
शिवाजी विद्यापीठ परिसरात विविध अभ्यासक्रमांचे ३९ अधिविभाग आहेत. भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान अधिविभागांत विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे घेतली जाते. अन्य विभागांत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविली जाते.
जादा विद्यार्थिसंख्येची अडचण
विविध व्यावसायिक अभ्याक्रमांना विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. त्यामुळे त्यांना बायोमेट्रिकचा अवलंब करणे शक्य आहे. मात्र, कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमांच्या ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिसंख्या किमान दोन हजारांच्या पुढे असते, त्यांना या प्रणालीचा अवलंब करणे अडचणीचे ठरत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत बायोमेट्रिक प्रणाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत संबंधित सुविधा नाही. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक बंधनकारक आहे; पण पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रणाली वापरावी, असे शासनाला अपेक्षित आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक असल्याची माहिती महाविद्यालयांनी आमच्या कार्यालयाला कळविली आहे.
- डॉ. अजय साळी,
शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आकडेवारी
- एकूण महाविद्यालये : २८३
- प्राध्यापकांची संख्या : ७७१७
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या : ६६५७
- विद्यार्थिसंख्या : २,५५,७५६