विद्यार्थ्यांनीही योद्धा बनावे! कोरोनाला परतवण्यासाठी पर्याय ठरू शकता तुम्हीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:37 PM2020-04-24T13:37:09+5:302020-04-24T13:39:31+5:30
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात.
कोल्हापूर : ‘कोविड’ साथीच्या काळात थेट रस्त्यावर न उतरतादेखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक योगदान देता येऊ शकते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी केले.
शिवाजी विद्यापीठाचा एनएसएस कक्ष आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत युट्यूबच्या माध्यमातून आयोजित आॅनलाईन प्रशिक्षणामध्ये त्यांचे बीजभाषण झाले. कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात.
विद्यार्थी घरबसल्या मास्क तयार करून परिसरातल्या नागरिकांसह कोविड वॉरियर्सना त्याचा पुरवठा करू शकतात. दरम्यान, या प्रशिक्षण सत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने झाला. कोरोनाच्या संकटकाळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी निभावत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्वागत केले.
विविध विषयांवर मार्गदर्शन
या प्रशिक्षण सत्रात ‘एनएसएस’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रादेशिक संचालक डी. कार्थिजेन, राज्य समन्वयक डॉ. अतुल साळुंखे, ‘युनिसेफ’च्या अधिकारी अपर्णा देशपांडे, ज्योती पोटारे, जी. के. पांडगे, राजलक्ष्मी नायर, स्वाती मोहपात्रा यांनी कोरोनाशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.