विद्यार्थ्यांनो, ‘एटीएस’ला सहकार्य करा
By admin | Published: January 6, 2015 12:29 AM2015-01-06T00:29:16+5:302015-01-06T00:56:57+5:30
भानुप्रताप बर्गे : राज्य दहशतवादीविरोधी पथकाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
कोल्हापूर : आपण ज्या ठिकाणी राहता, जाता, त्याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट दहशतवादीविरोधी पथकाला (एटीएस) कळवा व एटीएसला सहकार्य करा, असे आवाहन आज, सोमवारी राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे पुणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादासंबंधी विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेच्या आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे, प्राचार्य डॉ. एच. बी. पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विठ्ठल पाटील उपस्थित होते.
भानुप्रताप बर्गे यांनी, विद्यार्थ्यांनी आपली सर्वप्रथम मानसिकता बदलली पाहिजे. पोलिसांबद्दल असणारी भीती मनामध्ये न बाळगता ती काढून टाकली पाहिजे. आपल्या देशात सहा अतिरेकी वॉटेंड आहेत. त्यांचा वावर कोल्हापुरात होता. त्यामुळे ‘तुम्हाला रेल्वे स्टेशन, बसस्थानक, महाविद्यालय परिसरात अशाप्रकारची संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तुम्ही तत्काळ पोलिसांना कळवा. त्यासाठी नेहमी डोळे व कान उघडे ठेवा,’ असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी भानुप्रताप बर्गे यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना बर्गे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. नक्षलवादी सामना करण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी एकत्र का येत नाहीत? नक्षलवादी कारवाईमध्ये महिला आहेत का? नक्षलवादी कारवाईवेळी एखाद्या घटनेचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून सुरू असते. जसे २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे थेट प्रसारण वृत्त वाहिन्यांवर दाखविले जात होते. अशाप्रकारचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. त्यावर बर्गे यांनी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये नलिनी या महिलेचा हात होता याची आठवण करून दिली. तसेच नक्षलवादी कारवायांवेळी प्रसारमाध्यमांकडून होणारे थेट प्रसारण होणार नाही अशी काळजी घ्यावी. ते प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना एटीएसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी माहिती पत्रक देण्यात आले.
कोल्हापुरात सोमवारी महाराष्ट्र राज्य पोलीस व ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालय यांच्या विद्यमाने विद्यार्थी जागरूकता कार्यशाळेत बोलताना भानुप्रताप बर्गे.
बर्गे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे....
महाविद्यालयासाठी एकच प्रवेशद्वार असावे.
पुण्याप्रमाणे कोल्हापुरातील सर्वच महाविद्यालयांनी आवारात सीसीटीव्ही लावावेत.
आपला मोबाईल नंबर आहे तोच आपल्या गाडीचा शक्यतो नंबर ठेवावा.
मोबाईलचा वापर जाणीवपूर्वक टाळा.
विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जागृत करावी.
कोणत्याही वस्तूला हात लावू नका, अथवा व्यक्ती संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवा.