विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: March 2, 2016 01:23 AM2016-03-02T01:23:20+5:302016-03-02T01:25:35+5:30
मुगडेवाडी येथील दुर्घटना : दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर काळाचा घाला
कोल्हापूर : मुगडेवाडी (ता. पन्हाळा) येथे दहावीचा मराठीचा पेपर देऊन घरी आलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. आरती यशवंत मुगडे (वय १६) असे तिचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आरती मुगडे ही किसरूळ हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. तिचे वडील कळे-कोल्हापूर रिक्षा प्रवासी वाहतूक करतात. दोन मोठ्या बहिणींचा विवाह झाला आहे. घरी आई-वडील व आणखी दोन बहिणींसोबत ती राहत होती. काही महिन्यांपासून नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी घर पूर्ण होईपर्यंत तात्पुरते राहण्यासाठी शेजारी पत्र्याचे शेड उभारले आहे. त्यामध्ये ते सर्वजण राहत होते. मंगळवारी आरतीचा दहावीचा पहिला मराठीचा पेपर असल्याने चुलत भाऊ सचिन मुगडे याने तिला सकाळी दहा वाजता मोटारसायकलवरून बाजारभोगाव येथील परीक्षा केंद्रावर सोडले. परीक्षा देऊन दुपारी तीनच्या सुमारास ती घरी आली. जेवण करून गुरुवारच्या पान १ वरून) हिंदीच्या पेपरचा अभ्यास ती करीत बसली होती. वडील रिक्षा घेऊन कोल्हापूरला आले होते. लहान दोन बहिणी शाळेला गेल्या होत्या. त्यामुळे घरी आई व ती अशा दोघीच होत्या. चार दिवस नळाला पाणी न आल्याने घराच्या बांधकामावर पाणी मारले नव्हते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नळाला पाणी आल्याने गडबडीत बॅरेल भरण्यासाठी तिने नळाला विद्युत मोटार जोडली. तिची केबल पत्र्याच्या शेडमधील प्लगला जोडत असताना हाताला विजेचा धक्का बसून ती जाग्यावरच बेशुद्ध पडली. अचानक घडलेल्या या प्रकाराने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून वीजप्रवाह बंद केला. तिला तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिचा मृतदेह सीपीआरमध्ये आणला. याठिकाणी राजारामपुरी पोलिसांनी पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविला. तिचे आई-वडील व बहिणींनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)