शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची फरफट
By admin | Published: May 26, 2016 09:37 PM2016-05-26T21:37:19+5:302016-05-26T23:58:35+5:30
हलकर्णी परिसर : महाविद्यालयीन शिक्षणासाठी गाठावे लागतंय गडहिंग्लज; वेळ, पैसा खर्च
एम. ए. शिंदे -- हलकर्णी --हलकर्णी हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वभागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. परिसरात तीन कनिष्ठ महाविद्यालये आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी गडहिंग्लज गाठावे लागत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा खर्च होत असून, संपूर्ण दिवस जाण्या-येण्यामध्येच जात आहे. त्याचा त्यांच्या अभ्यासावर व आरोग्यावर परिणाम होत आहे. हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले तरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरफट थांबणार आहे.
बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. हलकर्णी परिसरातील हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी येथून १५० विद्यार्थी उत्तीर्ण, हिडदुगी कनिष्ठ महाविद्यालय, हिडदुगी येथून १९ विद्यार्थी, ए. आर. देसाई कॉलेज तेरणी येथून ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर परिसरातून वेगवेगळ्या शाखांतून २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके मिळाल्यानंतर प्रवेश कोठे घ्यायचा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे.
गडहिंग्लजला जाऊन शिक्षण घ्यायचे म्हटले, तर ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. परिणामी मुलींचे शिक्षण खंडित होणार आहे. गोरगरीब आणि मोलमजुरीवर संसाराचा गाडा हाकणाऱ्या पालकांसमोर दुष्काळी परिस्थितीत मुलांच्या बसपाससाठी पैसे कोठून उपलब्ध करावयाचे ही मोठी समस्या आहे.
सध्या हलकर्णीसह बसर्गे, येणेचवंडी, चंदनकूड, इदरगुच्ची, तेरणी, कळविकट्टी, कुंबळहाळ, मनवाड, नरेवाडी, नंदनवाड, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी येथील सर्व विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी गडहिंग्लजलाच ये-जा करीत आहेत.
तेरणी, इदरगुच्ची, बसर्गे या गावांतून मुक्कामाच्या गाड्या आहेत. या गाड्या बेरडवाडीमार्गे गडहिंग्लजला जातात. कॉलेज विद्यार्थ्यांमुळे पहिली ६.३० ची गाडी ‘हाऊसफुल्ल’ असते. साडेसहाची गाडी चुकली की, सव्वा सातपर्यंत बसथांब्यावर तिष्ठत उभे राहावे लागते.
गडहिंग्लज बसस्थानकात एसटी बस पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागतो. तेथून महाविद्यालयापर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे किमान पहिल्या तासाला विद्यार्थ्यांना मुकावे लागते. विद्यार्थ्यांनी एस.टी.चा सवलतीचा पास काढायचा म्हटले, तरी प्रत्येकवेळी किमान ४०० रुपये मोजावे लागतात.