एमपीएससी परीक्षेत तोतया विद्यार्थी
By admin | Published: August 29, 2016 12:38 AM2016-08-29T00:38:35+5:302016-08-29T00:38:35+5:30
कुडाळातील प्रकार : चौघे ताब्यात; संशयित बीड, अहमदनगरचे
कुडाळ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक पदासाठीच्या परीक्षेत बनावट कागदपत्रे सादर करून तोतया उमेदवार बसल्याची घटना रविवारी कुडाळ केंद्रावर उघडकीस आली.
या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात बीड जिल्ह्यातील पती, पत्नी व अहमदनगर जिल्ह्यातील दोघेजण मिळून चौघांवर गुन्हा दाखल केला असून, चारही जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार परीक्षा पर्यवेक्षकांनीच उघडकीस आणला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने कर सहाय्यक पदासाठी राज्यात परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा कुडाळ येथील कुडाळ हायस्कूल येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली होती. या केंद्रावर एकूण १५ खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था केली होती. त्यापैकी खोली क्रमांक १ व खोली क्रमांक ११ मध्ये पर्यवेक्षकांना हे दोन तोतया उमेदवार आढळून आले. त्यामुळे पर्यवेक्षक नंदकुमार तारी व विजय वरेरकर यांनी याबाबत कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत विजय वरेरकर व नंदकुमार तारी यांनी म्हटले आहे की, खोली क्रमांक ११ मध्ये सविता मुरलीधर बडे व सविनय महादेव बडे असे दोन उमेदवार एका मागोमाग बसले होते. त्यांची कागदपत्रे तपासताना संशय आल्यामुळे अधिक खोल तपासणी केली असता, सविनय महादेव बिडे यांनी त्यावेळी दाखविलेले आधारकार्ड, मतदान कार्ड हे बनावट असल्याचे सिध्द झाले. तसेच त्याचे खरे नाव गोविंद विष्णू नागरगोजे असून, तो बीड-शिरूर येथील असून, त्यांच्यापुढे बसलेली परीक्षार्थी उमेदवार सविता बडे ही त्याची पत्नी आहे. पत्नीला परीक्षेत मदत करण्याच्या उद्देशाने त्याने बनावट कागदपत्रे बनवून पत्नीच्या मागे अथवा पुढे परीक्षा क्रमांक येण्यासाठी नावात बदल करून तो परीक्षेला बसला होता.
तर त्यानंतर खोली क्रमांक १ मध्ये परीक्षार्थी उमेदवारांच्या ओळखपत्रांची तपासणी करताना परमेश्वर उध्दव आंधळे (वय २८, रा. जिरेवाडी-पाथर्डी, अहमदनगर) व त्याच्या मागे परमेश्वर उत्तम अंधारे (वय २४, रा. शेगाव) या विद्यार्थ्यांचा परीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांच्या ओळखपत्रांची कसून तपासणी करताना परमेश्वर उत्तम अंधारे यांनी ओळखपत्र म्हणून दाखविलेले मतदान कार्ड हे तपासाअंती बनावट असल्याचे आढळून आले. त्याचे मूळ नाव भगवान भागवत चेमटे असे असून, तो परमेश्वर आंधळे याला परीक्षेत मदत करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे करून बसल्याचे सिध्द झाले.
या प्रकरणामुळे केंद्रप्रमुख व निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, समन्वयक व प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, उपकेंद्र्रप्रमुख व तहसीलदार अजय घोळवे यांनी परीक्षा केंद्रावर येऊन या प्रकरणाची माहिती घेतली व त्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात आली.
कुडाळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जी. बाकारे व उपपोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी संशयित सविता बडे, गोविंद बडे, परमेश्वर आंधळे, भगवान चेमटे या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली.
अहवाल आयोगाकडे पाठविला जाणार : बोंबले
याप्रकरणी संशयितांनी आपण बनावट कागदपत्रे केली असल्याचे कबूल केले असून, त्यांनी लिहिलेला पेपर तसेच त्यासंदर्भातील अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक रवींद्र बोंबले यांनी दिली.
अधिक तपास करणार : बाकारे
संशयितांवर तोतयागिरी, बनावटीकरण करणे, त्याचा वापर करणे, महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व नमूद परीक्षामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांनी बनावट कागदपत्रे कुठे बनविली, याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जी. बाकारे यांनी दिली.
नावासह जन्मतारखेत साधर्म्य
या प्रकरणातील दोन्ही गुन्ह्यातील संशयितांनी नावाबरोबरच जन्मतारखेमध्ये देखील साधर्म्य साधले होते. आयोगाकडून नावांच्या आधारे अथवा जन्मतारखेच्या आधारे नंबर दिले, तरी संशयितांचे नंबर जवळच यावेत, यासाठी ही तजवीज त्यांनी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात सविता बडे या महिलेचाही समावेश आहे.
दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
हे प्रकरण खोली क्रमांक ०१ व ११ अशा दोन ठिकाणी घडल्याने कुडाळ पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.