‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णकप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:39 AM2019-02-26T00:39:42+5:302019-02-26T00:40:19+5:30
डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून
इचलकरंजी : डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून उत्कृष्ट ३५ प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या सर्व स्पर्धकांवर मात करत ‘डीकेटीई’च्या स्पार्क संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया आणि मानव रचना शैक्षणिक संस्थेच्या विद्यमाने ही स्पर्धा फरिदाबाद (हरियाणा) येथे भरविण्यात आली होती. स्पर्धेत ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्समधील अथर्व पळसुले, प्रतीक खोंद्रे व समीक्षा पोतदार या विद्यार्थ्यांनी टीम स्पार्क नावाने सहभाग नोंदविला. ‘इंटेलिजन्ट आॅटोनॉमस रोबोट’ प्रकल्प बनविला. हा रोबोट सध्याच्या उद्योगधंद्यातील आॅटोमेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून, वेळेची बचत आणि उत्पादनवाढीसाठी याचा खूप उपयोग होतो. विद्यार्थ्यांना प्रा. विनोद कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी एआयसीटीईचे व्हा. चेअरमन डॉ. एम. पुनिया व मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य संचालक कात्सुनोरी उशीकु, मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जपानचे मासानोरी तानीमोती उपस्थित होते.
या नावीन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी अॅटोमेशन लॅबोलेटरीद्वारे विद्यार्थ्यांना अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ज्ञान ‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना दिली. विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी ‘डीकेटीई’मध्ये पीएलसी, एचएमआय, स्कॅँडा ट्रेनिंगचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकाविण्यास फायदा होत आहे, असे प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी सांगितले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. यु. जे. पाटील, एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
फरिदाबाद (हरियाणा) येथील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप २०१९ स्पर्धेत इचलकरंजी डीकेटीईच्या विजेत्या संघास कात्सुनोरी उशीकु यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.