Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 07:33 PM2024-01-31T19:33:29+5:302024-01-31T19:41:07+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी ...
पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी बसमध्ये उभी असलेली शाळकरी मुलीचे पाय पत्रा सरकल्याने निर्माण झालेल्या पोकळीतून खाली चाकामधील इंजिनमध्ये अडकला. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
शुभश्री लहू पाटील (वय १४ ,रा. उत्रे, ता.पन्हाळा) असे जखमी विद्यार्थीनीचे नाव आहे. ती आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास आसुर्ले -पोर्ले येथील दत्त दालमिया कारखान्याच्या बसस्थाांब्यावर घडली.
अधिक माहिती अशी, सोनुर्लेहून पाटीलवाडी बस चालक जयसिंग भिमराव पाटील व वाहक संदीप विष्णू गायकवाड पन्हाळ्याकडे घेऊन निघाले होते. उत्रे येथे एसटी बसमध्ये बसलेली विद्यार्थीना शुभश्री दत्त दालमिया कारखान्याच्या बसस्थानकाजवळ येताच चालकाने ब्रेक मारल्यामुळे पत्रा निसटल्यामुळे रिकाम्या झालेल्या पोकळीतून शुभश्रीचे पाय चाकामधील इंजिनमध्ये अडकले. रस्त्यावर पडण्यापूर्वी बसमधील प्रवाशांनी तिला सावरल्याने अनर्थ टळला.
शुभश्रीच्या पायाला दुखापत झाल्याने बसच्या चालक वाहकाने तिला पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. असा प्रकार पुन्हा घडण्याअगोदर एस.टी.महामंडळाने वेळीच दखल घेऊन सुस्थितीत असलेल्या बसगाड्याचं प्रवासासाठी सोडाव्या अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे.