विद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:29 PM2019-10-03T12:29:18+5:302019-10-03T12:32:27+5:30
कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा आधार आहे. सध्या येथे सुमारे ४० विद्यार्थी राहतात. गेल्या महिन्याभरापासून या वसतिगृहातील भोजनगृह बंद आहे; त्यामुळे स्वयंपाकघर धुळीने माखले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता पसरली आहे.
भोजनगृह बंद असल्याने येथे जेवण मिळत नाही. त्याबाबत प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने बाहेरील काहीतरी खाऊन पोट भरावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या गैरसोईमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना वसतिगृहाच्या प्रशासनाला दिली; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.
सहसंचालकांनी लक्ष द्यावे
वसतिगृहाशी संबंधित विविध समस्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा त्रास होत आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अभ्यास करायचा की, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करायचा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी वसतिगृहातील दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
कार्यालयीन कामानिमित्त मी सध्या मुंबईला आलो आहे. या वसतिगृहातील अधीक्षकांना विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची समस्या तातडीने सोडविण्याबाबतची सूचना दूरध्वनीवरून केली आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार आहे.
- डॉ. अजय साळी