उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे
By Admin | Published: March 7, 2016 01:28 AM2016-03-07T01:28:33+5:302016-03-07T01:31:59+5:30
शिवाजी विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत संभ्रम; दिरंगाईचा फटका
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --शिवाजी विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. द्वितीय सत्र (सेकंड सेमिस्टर) आले तरी, पहिल्या सत्रातील (फर्स्ट सेमिस्टर)मधील उत्तरपत्रिकेच्या विद्यापीठाकडे मागणी केलेल्या छायांकीत प्रत (फोटो कॉपी) अद्याप मिळाल्या नाहीत. फोटो कॉपी मिळणार कधी? त्यानंतर फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी आणि त्याचा निकाल येईपर्यंत द्वितीय सत्र संपणार आहे. त्यामुळे फोटो कॉपीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांत अनुुत्तीर्ण झालेले अथवा अपेक्षित गुण न मिळालेले काही विद्यार्थी उत्तरपत्रिका फेरतपासणीची मागणी करतात. यासाठी पहिल्यांदा विद्यार्थी फोटो कॉपी मागवितात. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर सात दिवसांत फोटो कॉपी देणे विद्यापीठाला बंधनकारक आहे. फोटो कॉपीमध्ये काही गुणांची वाढ दिल्यास फेरतपासणीसाठी अर्ज केला जातो. अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांना निकाल द्यावा लागतो, अशी विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, वास्तवाचा अनुभव विद्यार्थ्यांना वेगळाच आहे. असाच अनुभव अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आला. अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्रातील परीक्षांचा निकाल २७ जानेवारीला लागला. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने काहींनी फोटो कॉपीसाठी अर्ज केला. या प्रक्रियेला महिना उलटला तरी अद्याप त्यांच्या हातात काहीच पडलेले नाही. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाने सर्वच परीक्षा एक महिना अगोदर घेतल्या आहेत. अभियांत्रिकीची परीक्षा साधारणत: १५ मेपासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात; पण यावर्षी ९ ते २४ एप्रिल या कालावधीत परीक्षा संपविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
या परीक्षेसाठी एक महिना राहिला असताना मागील परीक्षेतील पेपरची फोटोकॉपी अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आता जरी फोटो कॉपी मिळाली तरी, फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी, त्याचा निकाल लागणार कधी, तोपर्यंत सेकंड सेमिस्टर पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, ‘फोटो कॉपी मिळेल’, एवढे साचेबद्ध व मोघम उत्तर सांगितले जाते. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराने विद्यार्थी मात्र मेटाकुटीला आले आहेत.
परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिका
एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे.
परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिका
एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे.
उत्तरपत्रिका तपासणीचे विकेंद्रीकरण केल्याने सातारा, सांगली जिल्ह्णांतील विविध केंद्रांवर पेपर असतात. जशी विद्यार्थ्यांची मागणी होईल, त्याप्रमाणे पेपर मागविले जातात. त्यामुळे उशीर होतो, पण बहुतांशी उत्तरपत्रिका पाठविलेल्या आहेत,
येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळतील.
- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ
तक्रारीसाठी
विद्यार्थी पुढे येईनात
अभियांत्रिकी विभागातील हा प्रकार एक उदाहरण आहे. अशा अनेक प्रकारांमुळे विद्यार्थी घायकुतीला येतात, पण कारवाईच्या भीतीने विद्यापीठ प्रशासनाविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे
कोणी धाडस करत नाही.