विद्यार्थ्यांसाठी ‘केएमटी’च्या दोन फेऱ्या सुरू करणार
By admin | Published: July 25, 2014 11:46 PM2014-07-25T23:46:14+5:302014-07-26T00:34:48+5:30
विजयालक्ष्मी बिदरी यांचे आश्वासन
कोल्हापूर : के.एम.टी.कडे असणाऱ्या खासगी ठेकेदारांनी थकबाकीसाठी २० मेपासून ३० बसची सेवा बंद केल्यानंतर १ जून २०१४ पासून आजूबाजूच्या १९ गावांतील बससेवा बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आज, शुक्रवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी किमान सकाळी व संध्याकाळच्या टप्प्यात दोन-दोन फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त बिदरी यांनी यावेळी दिले.
के.एम.टी.कडे असणाऱ्या ३० खासगी बसेसच्या ठेकेदारांनी एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी त्यांची बससेवा बंद केली. तसेच दररोज किमान सव्वादोन लाखांहून अधिकचे नुकसान सोसणाऱ्या के.एम.टी.पुढील अडचणी वाढल्या आहेत. यातच ८५० कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकण्याचे प्रकार वाढल्याने शहरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘के.एम.टी.’ने १९ गावांतील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता लवकरच विद्यार्थ्यांसाठी या गावांतील बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
प्रतिदिन किमान दोन फेऱ्या सुरू करण्याच्या पालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना प्रामुख्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आयुक्त बिदरी यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)
बालिंगा, कोगे, बहिरेश्वर, खुपिरे-यवलूज, कुडित्रे, शिरोली दुमाला, कोयना कॉलनी, कात्यायनी, वडकशिवाले, बाचणी, खेबवडे, येवती, चुये, हळदी, बाचणी, बेले, वाकरे, मौजे वडगाव या मार्गांवरील बससेवा १ जून २०१४ पासून बंद करण्यात आली होती. ही सेवा आता विद्यार्थ्यांसाठी सकाळी व संध्याकाळच्या सत्रात सुरू केली जाणार आहे.