सुरळीत बससेवेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Published: January 6, 2015 12:09 AM2015-01-06T00:09:51+5:302015-01-06T00:46:06+5:30
शिराळ्यातील प्रकार : बस अडवून रस्त्यावरच ‘अभ्यास’
शिराळा : शिराळा-बेलवडे ही सायंकाळी सहाला सुटणारी बस रात्री आठपर्यंत सुटत नसल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी, नागरिक, महिलांनी आज (सोमवारी) शिराळा बसस्थानकावर बसेस अडवून, तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच पुस्तके-वह्या काढून अभ्यास करण्याचे अनोखे आंदोलन केले. अखेर आगारप्रमुख जे. डी. पाटील यांनी ही बस वेळेत सोडण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.शिराळा-बेलवडे बसची ६ वा. सुटण्याची वेळ आहे. शाळा पाचच्या दरम्यान सुटतात. एस.टी. बसस्थानकात मुले आली की रात्री ८ पर्यंत बस स्थानकावर लागत नाही. त्यामुळे लहान मुले, विद्यार्थ्यांना तीन-तीन तास ताटकळत बसावे लागते. घरी वेळेवर पोहोचता येत नाही. पालकांनी बसस्थानकावर दूरध्वनी केला की उध्दट उत्तरे मिळतात. विद्यार्थ्यांही अशीच उत्तरे मिळतात. ही बस वेळेत सोडावी, यासाठी माजी सरपंच इब्राहिम मुलाणी यांनी १५ डिसेंबरपासून पत्रव्यवहार केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे आज मुलाणी यांच्यासह माजी सरपंच रघुनाथ धुमाळ, विलास पाटील, अरुण पाटील, तुकाराम नांगरे, ७२ वर्षांच्या लीलाताई हसबनीस, संगीता कांबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुस्तके, वह्या काढून रस्त्यावरच अभ्यास सुरू केला. जवळजवळ अर्धा तास आंदोलन सुरू होते. त्यानंतर आगारप्रमुख पाटील यांनी ही बस सहाला वेळेत सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी स्थानकप्रमुख सौ. व्ही. एस. चौगुले, अविनाश शिंदे, बी. डी. खोत उपस्थित होते. (वार्ताहर)
...तर पुन्हा आंदोलनाचा इशारा
ही गाडी शिराळा, शिरशी, धामवडे, गिरजवडे, मानकरवाडी, बेलवडे या डोंगरी भागात प्रवास करते. ती वेळेत न सुटल्यास विद्यार्थ्यांना रात्री दहा-दहा वाजतात. ही गाडी साडेपाचला सुटण्याची लेखी मागणीही आंदोलनकर्त्यांनी दिली. जर गाडी वेळेत सुटली नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.