कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:55 AM2024-01-24T11:55:08+5:302024-01-24T11:55:36+5:30

कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली.

Students of Kolhapur Municipal School will fly to ISRO; Unique opportunity for state merit list students | कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी

कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी

कोल्हापूर : कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. त्यामुळे घराच्या अंगणातून आकाशाकडे डोळे करत विमान पाहण्यातच त्यांचा आनंद. त्यात बसण्याचं स्वप्न त्यांनी कधी पाहिलंही नसेल. पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने महापालिका शाळेतील १७ विद्यार्थ्यांना बंगळुरूमधील इस्रोला (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) भेट देण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातून हे विद्यार्थी विमानाने जाणार असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आकाश ठेंगणे झाले आहे. 

शहरात महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकत असल्याने मनपा शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वासार्हता वाढली आहे. गतवर्षी ९४ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले होते. यातील १७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे जरगनगर, नेहरूनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी या शाळांमधील आहेत. या विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे. सामान्य घरातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानप्रवास करायला मिळत असल्याने हे विद्यार्थी आनंदून गेले आहेत. ५ फेब्रुवारीला हे विद्यार्थी कोल्हापुरातून विमानाने बंगळुरूला जातील. त्यानंतर ते इस्रो केंद्राला भेट देणार आहेत.

इस्रोला जाणारे विद्यार्थी

शौर्य यशवंत पाटील, अनन्या सुशांत पोवार, अर्णव शशिकांत भोसले, अर्थव सागर वाडकर, काव्या राहुल महाजन, वसुंधरा विशाल सावंत, प्रणव महेश अरभावे, प्रतीक्षा बाबाजी फाळके, सिद्धेश बाळासाहेब काळे, सोहम परशराम पाटील, ज्ञानेश्वरी गजानन साळुंखे, सिद्धी दत्तात्रय अडसुळे, सिराज सागर चव्हाण, चंदन भोलानाथ कटवे, शौर्या अभिजित मोरे, आर्या दीपक चाटे, अर्णव सुकेश पाटील.

गुणवत्ता यादीत आलेल्या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेनुसार इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे. प्रत्येकवर्षी हा उपक्रम राबविला जाईल. या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. - केशव जाधव, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, कोल्हापूर

Web Title: Students of Kolhapur Municipal School will fly to ISRO; Unique opportunity for state merit list students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.