विद्यार्थ्यांचे ‘उघड्यावर अभ्यास आंदोलन’
By admin | Published: March 5, 2016 12:33 AM2016-03-05T00:33:38+5:302016-03-05T00:33:57+5:30
‘एआयएसएफ’चा पुढाकार : विद्यापीठातील अभ्यासिका सुरू करा
कोल्हापूर : विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील जुनी अभ्यासिका सुरू करावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)चे गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ‘उघड्यावर अभ्यास’ असे अनोखे आंदोलन केले. विद्यापीठाच्या आवारातच तापलेल्या रस्त्यावर विद्यार्थी तोंडाला काळ््या फिती बांधून अभ्यासास बसले आणि त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. संबंधित मागण्यांबाबत सात दिवसांच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना दिले.
वाचनसंस्कृतीस पाठबळ द्या, अभ्यासिका प्रशासनाची हुकुमशाही बंद करा, छत्रपती शाहूंच्या नगरीत विद्यार्थी अभ्यासिकेहून वंचित, असे फलक घेऊन आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांसह सुमारे तीनशे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले.
फोंडे म्हणाले, गेले चार महिने आम्ही ग्रंथालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्री, आमदार, खासदार व कुलगुरूंनाही निवेदन दिले आहे. तरीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. विद्यापीठाने नवीन अभ्यासिका सुरू केल्याचे आम्ही स्वागत करतो; पण ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील जुनी अभ्यासिका सुरू ठेवावी. अभ्यासिकेतील बायोमेट्रिक पद्धतीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. या प्रवेश पद्धतीमुळे फक्त ‘नॅक’चे अधिकारी खुश होतात; पण विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
नवीन अभ्यासिका सुरू केली आहे; पण ती आठ ते दहा तासच सुरू असते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते; यासाठी ती २४ तास सुरू ठेवावी. यावेळी विनायक अलकुंटे, शिरीष माळी, समरजित पाटील, अमोल माने, अरविंद जगदाने, सुशांत पाटील, आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. (प्रतिनिधी)
नवीन अभ्यासिका सुरू केल्यानंतर जुनी बंद करण्यात आली. ती जागा आणि फर्निचर धूळ खात पडून आहे. जुन्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिकची सक्ती न करता मुक्त प्रवेश दिला जावा.
- रमेश पाटील (विद्यार्थी)