नापास विद्यार्थ्यांनी दुसऱ्यास शिकवू नये
By admin | Published: October 26, 2015 11:53 PM2015-10-26T23:53:30+5:302015-10-27T00:05:18+5:30
नीलम गोऱ्हे : अशोक चव्हाण यांना टोला
सांगली : परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्याला पेपर लिहायला शिकवायचा नसतो. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्षाचे अपयश लपवून शिवसेनेला सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला.
त्या म्हणाल्या की, आदर्श घोटाळा उजेडात आल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. सत्तेत घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने तेव्हा लकवा आलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. सत्तेत असूनही अशा टीका त्यावेळी झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने लोकहितासाठी एखाद्या गोष्टीसाठी सरकारी धोरणावर टीका केली म्हणून दुटप्पी भूमिका घेतली असे समजू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी हे सरकार स्थिर ठेवणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या अपेक्षा त्यांनी खुशाल बाळगल्या तरी चालतील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. याकुब मेमनच्या दयेसाठी समर्थन करणाऱ्या कॉँग्रेस सरकारने आम्हाला कोणताही सल्ला देऊ नये. देशद्रोह करणाऱ्या व्यक्तीला धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पाठिंबा देणाऱ्यांना तसा कोणताही अधिकार नाही. सिंचन घोटाळ्याची सध्या चौकशी सुरू आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कौल योग्यच...
विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतर ‘लोकमत’ने जनतेचा कौल घेतला आहे. यामध्ये जनतेने सरकारला दहापैकी ५.७२ गुण दिले होते. त्याचा उल्लेख करीत गोऱ्हे यांनी, लोकांचा हा कौल योग्यच असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब काटकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन गोऱ्हे यांनी सोमवारी केले. यावेळी आप्पासाहेब यांच्या पत्नी सुनंदा, पुत्र शिवराज, शंभोराज यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले.
गटबाजी नव्हे, मतभेद!
जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजी नाही. किरकोळ स्वरूपातील काही मतभेद त्यांच्यात आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे त्यांनी सांगितले.
खासदार कमी पडले
जिल्ह्यातील सिंचन योजनांना केंद्र शासनाकडून ज्या गतीने निधी मिळायला हवा होता, तेवढा मिळाला नाही. खासदार संजय पाटील याबाबतीत कमी पडल्याचे दिसते, असे त्या म्हणाल्या.