निकालाच्या फेरमूल्यांकनासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:03 PM2020-10-08T12:03:05+5:302020-10-08T12:06:28+5:30
तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत. या निकालाचे फेरमूल्यांकन करावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठात बुधवारी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलसचिव डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.
कोल्हापूर : तीन आणि पाच वर्षांच्या विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालात त्रुटी आढळल्या आहेत. या निकालाचे फेरमूल्यांकन करावे, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठात बुधवारी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलसचिव डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विधि महाविद्यालयांतील संबंधित अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हे या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या. कोरोनामुळे एप्रिल-मेमधील सत्रांच्या परीक्षा न घेता विद्यापीठाने निकाल घोषित केले आहेत.
या निकालासाठी जे निकष लावले गेले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य शासन आणि विद्यापीठाच्या दि. ८ मे रोजीचे परिपत्रक आणि दि. १५ मे रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि ५० टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे सरासरी गुण असे मूल्यांकन होणार होते.
परंतु, विद्यापीठाच्या २९ मे रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार ५०-५० टक्के मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे शंभर गुणांचा पॅटर्न असणारे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकालाचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.