लिंक मिळाली नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:55+5:302021-08-24T04:29:55+5:30
गेल्या आठवड्यात बी. ए., बीएस्सी. तीन अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू झाली. मात्र, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या काही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा व ...
गेल्या आठवड्यात बी. ए., बीएस्सी. तीन अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू झाली. मात्र, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या काही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून लिंक प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वडजू, खटाव, औंध, रहिमतपूर, आदी परिसरातील विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. बी. एस्सी आणि बी.ए भाग दोनच्या परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काही विद्यार्थ्यांना मॉक टेस्टचा ई-मेल अथवा लिंक मिळालेली नाही. परीक्षा तोंडावर आलेली असताना लिंक मिळाली नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. एम. एस्सी. अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवारी होणार आहे. त्याच्या मॉक टेस्टची देखील लिंकही मिळालेली नाही. याबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील अधिविभागात संपर्क साधला असता त्यांना परीक्षा मंडळाकडे चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाने दिलेल्या हेल्पलाइनवर चौकशी केली असता त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. शुल्क, अर्ज वेळेत भरूनही परीक्षा देत येत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.
चौकट
अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार
तांत्रिक अडचणीमुळे लिंक मिळाली नसल्याने परीक्षा देता आली नसल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची लवकर परीक्षा घेण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी सोमवारी सांगितले.