सरकारी पदांचे खासगीकरण थांबवा, कोेल्हापुरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा गळफास मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:31 PM2018-02-07T19:31:42+5:302018-02-07T19:39:24+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोेल्हापुरात बुधवारी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गळफास’ मोर्चा काढला. त्यांनी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती आणि आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
कोल्हापूर : ‘सरकारी पदांचे खासगीकरण थांबवा’, ‘बेरोजगार उपाशी, मंत्री तुपाशी’, ‘नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’ अशा घोषणा देत विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोेल्हापुरात बुधवारी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गळफास’ मोर्चा काढला. त्यांनी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती आणि आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
येथील बिंदू चौकात दुपारी साडेबारा वाजता विद्यार्थी-विद्यार्थिनी जमल्या. येथून दुपारी सव्वा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ‘सरकारी पदांचे खासगीकरण थांबवा’, ‘बेरोजगार उपाशी, मंत्री तुपाशी’, ‘नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’ अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला.
आईसाहेब महाराज चौक, फोर्ड कॉर्नर, विल्सन पूल, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आला. मोर्चातील सहभागी काही विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हातांत विविध मागण्या आणि सरकारचा निषेध करणारे फलक होते. काही विद्यार्थी हे प्रतीकात्मक गळफास लावून सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ठिय्या मारला. विविध मागण्यांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला.
येथे झालेल्या सभेत ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय नेते गिरीश फोंडे, सचिन लोंढे-पाटील, सचिन कनगुटकर, रेश्मा पवार, आदींनी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले.
आंदोलनात दीक्षा पाटील, आरती रेडेकर, शंतनू घोटणे, मंगेश हजारे, सोमनाथ सातपुते, प्रशांत आंबी, विशाल पाटील, रणजित यादव, राधेश पोळ, समरजित पाटील, पवन रजपूत, हरीश कांबळे, दिलदार मुजावर, आदींसह कोल्हापुरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, तयारी करणारे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी, सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले.
मागण्या अशा
- * रिक्त असणारी १ लाख ७० हजार पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत.
- * केंद्र सरकारच्या ४ लाख २० हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भराव्यात.
- * शिक्षकांच्या २३ हजार व प्राध्यापकांच्या नऊ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात.
- * राज्य सेवेच्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी. प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावण्यात यावी.
- * ‘यूपीएससी’च्या धर्तीवर ‘एमपीएससी’चे दरवर्षी वेळापत्रक जाहीर व्हावे.
- * स्पर्धा परीक्षांमध्ये चाललेल्या डमीसारख्या गैरप्रकारांचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा.
- * बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी.
.... अन्यथा विधानभवनावर लाखो युवकांचा मोर्चा
विविध मागण्यांसाठी राज्यभर युवक रस्त्यांवर उतरले आहेत. दरवर्षी एक कोटी रोजगार पुरवितो अशी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या नोटाबंदी, जीएसटीमुळे खासगी क्षेत्रात बेरोजगारी वाढत आहे. आता युवकांना ते ‘पकोडे विका’ असे सल्ले देत आहे. या सरकारच्या धोरणाविरोधात आम्ही मोर्चा काढला आहे, असे आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय नेते गिरीश फोंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारने या मागण्या २० फेब्रुवारीपर्यंत मान्य न केल्यास येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर लाखो युवकांचा मोर्चा काढण्यात येईल. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरात बेरोजगार परिषद घेणार आहे.