फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Published: December 9, 2015 01:53 AM2015-12-09T01:53:21+5:302015-12-09T01:53:37+5:30

हेरवाडमध्ये विहिरीत आढळला मृतदेह

Student's suicide as the fee is not paid | फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

कुरुंदवाड : वडिलांनी महाविद्यालयाची फी भरली नाही, या नैराश्येतून हेरवाड (ता. शिरोळ) येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या रमाबाई दिनकर शिंगे (वय १७) हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. सोमवारी दुपारपासून ती बेपत्ता होती. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली आहे. रमाबाई ही कुरुंदवाड येथील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. महाविद्यालयाची फी वडिलांनी भरली नाही, या नैराश्येतून सोमवारी (दि. ७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती घरातून निघून गेली होती.
रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. अखेर तिच्या वडिलांनी रमाबाई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान, आज मंगळवारी दुपारी शिंगे यांच्या घराशेजारील म्हारकी नावाच्या विहिरीजवळ रमाबाई हिच्या चपला दिसल्या. त्यामुळे पोलिसांनी व्हाईट आर्मीच्या जवानांना पाचारण करून विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दिनकर शिंगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
रमाबाई हिच्या पश्चात आई-वडिल, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. तिची दुसरी बहीण इयत्ता आठवीत, तर भाऊ इयत्ता सहावीत शिकत आहे.
दहावीला ८९ टक्के गुण
रमाबाईने गतवर्षी दहावीच्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून हेरवाड हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता. (वार्ताहर)
 

Web Title: Student's suicide as the fee is not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.