Kolhapur- शिक्षणाचा परीघ: स्पर्धात्मक, कौशल्याकडे विद्यार्थ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:33 IST2025-01-29T13:32:42+5:302025-01-29T13:33:10+5:30
जयसिंगपूर शहर शिक्षणाचे माहेरघर बनले

Kolhapur- शिक्षणाचा परीघ: स्पर्धात्मक, कौशल्याकडे विद्यार्थ्यांचा कल
संदीप बावचे
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा संमिश्र कल दिसून येत आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या संशोधन प्रवृत्तीत वाढ होत असली तरी कौशल्य व स्पर्धात्मक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. प्राथमिक शाळा कात टाकत आहेत. विशेषत: जयसिंगपूर शहर शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. एकूणच कृषिप्रधान या तालुक्याला शैक्षणिक क्रांतीची झालर असली तरी शिक्षणाचे महत्त्व आणखी रुजविण्यासाठी संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथील युवकांना पारंपरिक शेती, व्यवसायाबरोबर तांत्रिक शिक्षणाची गरज ओळखून ३५ वर्षांपूर्वी तालुक्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांची सुरुवात झाली. नवनवे तंत्रज्ञान, संशोधन, विद्यार्थी विकास असे विविध उपक्रम राबवून व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्षेत्र निर्माण करून त्यांना उद्योग व नोकरीसाठी नवी वाट निर्माण करून देण्यात डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी, शरद इन्स्टिट्यूट, दत्त पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी याचबरोबर इतर तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचा या तालुक्यांच्या विकासामध्ये वाटा आहे.
मधल्या काळात खासगी शिक्षण संस्था वाढल्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थी संख्या कमी झाली होती. त्यानंतर शिक्षकवर्ग जागृत झाला. जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यामुळेच शासकीय शाळांना चांगले दिवस येत आहेत. सीईटी, टीईटी अशा प्रवेशपात्र परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत आहे. कला, वाणिज्यबरोबरच विज्ञान शाखांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येते.
डिप्लोमा, डिग्रीची अनेक महाविद्यालयांचे पेव फुटल्यानंतर डिप्लोमा, डिग्रीचे शिक्षण हे प्रतिष्ठेचे असे समजून विद्यार्थ्यांचा कल वाढला. मात्र, अशी अनेक महाविद्यालये बंद पडली आहेत.
तालुक्यात जयसिंगपूर, कुरुंदवाडमधील उच्च महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. याठिकाणी प्रवेश मर्यादा संपल्यानंतर विद्यार्थी सांगली, मिरज, इचलकरंजीसारख्या शहरात शिक्षणसंस्थांचा पर्याय निवडतात. एकूणच नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शासकीय शिक्षण व्यवस्थेत होत असलेला बदल त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा आलेख वाढेल, अशी अपेक्षा आहे.
स्पर्धात्मक अभ्यासक्रमाकडे कल
ग्रामीण भागामध्ये स्पर्धात्मक अभ्यासक्रमाकडे कल वाढल्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत आहेत, तर तत्काळ उत्पन्न सुरू होईल या दृष्टिकोनातून अन्य विद्यार्थी कौशल्य अभ्यासक्रमाकडे वळत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.
शिक्षण विभागाचे नियोजन
जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाड्यांमधील मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुणवत्ता, पट व स्पर्धात्मक असे धोरण राबविले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे.
दृष्टिक्षेपात शैक्षणिक सोय
- तीन वरिष्ठ महाविद्यालये
- ३६६३ एकूण विद्यार्थी संख्या
- कौशल्य विकास शिक्षण संस्था : १
- आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालये : १
- होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये : २
- अभियांत्रिकी महाविद्यालये : ३
- कृषी महाविद्यालये : २
- औषध निर्माणशास्त्र महाविद्यालये : २
- नर्सिंग कॉलेज : २
- फिजिओथेरपी महाविद्यालये : १
शाळांची संख्या
- प्राथमिक शाळा : १६४
- माध्यमिक शाळा : ६८
- उच्च माध्यमिक शाळा : २९
- इंग्रजी माध्यम शाळा : ३४
- नगरपालिका शाळा : ९
- शासकीय निवासी शाळा : १
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था : ५
- आश्रमशाळा : ४
- खासगी शाळा : ६३
- उर्दू शाळा : ३७
- कन्नड शाळा : १
- पशुधन संस्था : १
- शिरोळ तालुका एकूण शाळा : ३०४
कौशल्य आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येते. पारंपरिक अभ्यासक्रम हा समाजासाठी उपयोग नाही असे होऊ शकत नाही. कला, विज्ञान, वाणिज्य क्षेत्रातही विविध संधी उपलब्ध आहेत. आवडीचे शिक्षण घेत असताना हे शिक्षण काय आहे याची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. संधी असलेले व आवडणाऱ्या अभ्यासक्रमाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी सक्षम बळ मिळेल. - प्राचार्य डॉ. एस. ए. मांजरे, जयसिंगपूर महाविद्यालय.