विद्यार्थ्यांना ईबीसीच्या परताव्याची प्रतीक्षा----लोकमत हेल्पलाईन न्यूज

By admin | Published: May 3, 2016 12:10 AM2016-05-03T00:10:15+5:302016-05-03T00:39:12+5:30

पालक नाराज : अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ट्युशन फीमधील ५० टक्के परतावा

Students waiting for EBC returns ---- Lokmat Helpline News | विद्यार्थ्यांना ईबीसीच्या परताव्याची प्रतीक्षा----लोकमत हेल्पलाईन न्यूज

विद्यार्थ्यांना ईबीसीच्या परताव्याची प्रतीक्षा----लोकमत हेल्पलाईन न्यूज

Next

कोल्हापूर : अभियांत्रिकी  महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (ईबीसी) त्यांनी भरलेल्या शुल्कातील ५० टक्के परताव्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सन २०१४-१५ मधील ईबीसीचा परतावा त्यांना अजून मिळालेला नाही. याबाबतची व्यथा शाहूपुरीतील पालक रवींद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे मांडली.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक ईबीसी सवलतीला पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या शुल्कापैकी ट्युशन फीमधील ५० टक्के रकमेचा परतावा दिला जातो. सन २०१४-१५ मधील ईबीसी परतावा लवकरच दिला जाईल, असे सांगून या सवलतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी खाते उघडले. पण, यानंतर वर्ष उलटत आले तरी, अद्यापही त्यांना ईबीसी सवलतीचा परतावा मिळालेला नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शुल्काची रक्कम मोठी आहे. काही पालकांनी कर्ज काढून आपल्या पाल्यांचे शुल्क भरले आहे. अशा स्थितीत त्यांचे पाल्य ईबीसी सवलतीसाठी पात्र असूनही त्याचा परतावा मिळत नाही .
पालकांनी महाविद्यालयात विचारणा केल्यानंतर त्यांना शासनाकडून पैसे यायचे आहेत, असे उत्तर असल्याचे रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत पुण्यातील कार्यालयाशी संपर्क साधला असता लवकरच ईबीसीचा परतावा दिला जाईल, असे आश्वासन मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात खात्यावर रक्कम जमा झालेली नाही.
दरम्यान, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे मत जाणून घेण्यासाठी संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयात (२२६२०६०१,०२ आणि २२६४११५०/५१) या क्रमांकावर दूरध्वनी केला असता याठिकाणी तो उचलण्यात आला नाही. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल. (प्रतिनिधी)

ईबीसी लवकरच मिळेल
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ईबीसीचा परतावा लवकर मिळावा यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिले होते, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख अमित वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणाची माहिती घेतली असता सन २०१४-१५ चा ईबीसी परतावा मंजूर झाला असून, तो लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल तसेच तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सन २०१५-१६ साठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, असे काही महाविद्यालयांतून सांगण्यात आले आहे.

Web Title: Students waiting for EBC returns ---- Lokmat Helpline News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.