शालेय प्रवासासाठी विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:10 PM2022-09-28T12:10:51+5:302022-09-28T12:11:14+5:30
ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसतील अशा विद्यार्थ्यांना प्रवासखर्च म्हणून या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
कोल्हापूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२२-२३ करिता पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासखर्च म्हणून महिन्याला सहाशे याप्रमाणे वर्षाचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
जानेवारीत मिळणार पैसे
विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुदानासाठी गटांकडून २०२२-२३ करिता यावर्षी जिल्ह्यातील १५९८ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून सुमारे ९५, ८८००० इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. ज्या शाळांची मान्यता रद्द झाली किंवा शाळा बंद पडली त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. यातील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसतील अशा विद्यार्थ्यांना प्रवासखर्च म्हणून या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
आधार-बॅंक खाते लिंक केले का?
ज्या शाळांची मान्यता रद्द झाली किंवा शाळा बंद पडली त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसतील अशा विद्यार्थ्यांना प्रवासखर्च म्हणून महिन्याला सहाशे याप्रमाणे वर्षाचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासाठी या विद्यार्थ्यांचे आधार-बॅंक खाते लिंक करण्यात येत आहेत. याची कार्यवाही सुरू असून, डिसेंबरअखेर ही मोहीम पूर्ण होणार आहे.
महिन्याला ६०० मिळणार
अनुदानासाठी गटांकडून २०२२-२३ करिता प्रस्ताव मागविलेले आहेत. समग्र शिक्षा अंतर्गत यावर्षासाठी या सुविधेसाठी प्रतिविद्यार्थी प्रतिमहा तीनशे रुपये वाढवून सहाशे रुपये याप्रमाणे दहा महिन्यांकरिता अनुदान मंजूर असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडून देण्यात येत आहे. २०२१-२२ करिता ११९७ विद्यार्थ्यांना १७,९५००० इतकी रक्कम देण्यात आली आहे.
योजनेचे निकष काय?
इयत्ता पहिली ते पाचवीच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर परिसरात उच्च प्राथमिक शाळेची सुविधा नसलेल्या, शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे अनुदान देण्यात येते. पीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर वाहतूक सुविधेसाठी हा निधी देण्यात येतो. गेली चार वर्षे प्रतिमाह तीनशे रुपये याप्रमाणे हे अनुदान देण्यात येत होते.
शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समग्र शिक्षा वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात येते. गेली चार वर्षे ही योजना कार्यान्वित आहे. याचा लाभ शहरातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे. -आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, कोल्हापूर.