मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:23+5:302021-02-06T04:45:23+5:30

कोल्हापूर : कोरोनाची भीती कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या आहेत, पण परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र वेळेत एसटी मिळत नसल्याने ...

Students will get the vehicle to school | मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी शाळेत

मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी शाळेत

Next

कोल्हापूर : कोरोनाची भीती कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या आहेत, पण परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र वेळेत एसटी मिळत नसल्याने पंचाईत होत आहे. एसटी सुरू झाली आहे, पण ती वेळेत नसल्याने मिळेल त्या वाहनाने वेळेत शाळा गाठावी लागत आहे. यावर सायकलीचा पर्यायही विद्यार्थ्यांनी निवडल्याचे दिसत आहे. वडापच्या वाहनांचाही आधार घेतला जात आहे.

पाचवी ते आठवी, नववी ते बारावी असे ५० ते ७५ टक्के उपस्थिती निश्चित करून एक दिवसआड याप्रमाणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग भरत आहेत. लॉकडाऊनपूर्वीपर्यंत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संबंधित शाळांच्या मागणीनुसार त्या-त्या भागातील एसटी आगारातून शालेय फेऱ्या सोडल्या जात होत्या. शाळा ते घर अशी ने-आण केली जात होती. एसटी महामंडळाने प्रसंगी तोटा सहन करून या फेऱ्या सुरू ठेवल्या. लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद राहिल्याने या बंद झालेल्या फेऱ्या मात्र अजूनही बंदच आहेेत.

शाळेला तर जायचे आहे, पण एसटीच वेळेत येत नसल्याने शाळेत पोहोचेपर्यंतचा विद्यार्थ्यांचा प्रवास मात्र त्रासदायक ठरत आहे. जवळच्या मार्गावर सायकल, तर जरा लांबच्या मार्गावर वडापच्या रिक्षा, ट्रॅक्स यांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे.

एसटी ही विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वस्त आणि सुरक्षित साधन आहे, पण आता तेच नसल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च्या जोखमीवर शाळेपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. रोज किमान तास, दीड तासाचा वेळ यासाठीच जात आहे. आधीच संपूर्ण वर्ष वाया गेले आहे, आता एप्रिल मे महिन्यात परीक्षांना सामोरे जायचे, तर अभ्यासाऐवजी शाळेत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

प्रतिक्रिया

एसटीच्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांकडे ७५० एसटी आहेत. त्यापैकी ६७० एसटी आता रस्त्यावर धावत आहेत. दिवसातून एकदा तरी एसटी पोहोचत नाही, असे जिल्ह्यातील एकही गाव आजच्या घडीला नाही. फक्त ८० एसटी बसेस अजून बंद आहेत. त्या गर्दी होईल त्या मार्गावर सोडण्याचे नियोजन आहे.

शिवराज जाधव, वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

चौकट ०१

एसटी महामंडळाचे हात वर

यावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, शाळांकडून शालेय फेऱ्यांची मागणी होत आहे, पण शाळेत अजून विद्यार्थ्यांची उपस्थितीतच ३० टक्क्यांवर जात नाही, मग एक किलोमीटरला डिझेलसाठीचा २१ रुपयांचा खर्च करून तो भरून काढायचा तरी कसा. एसटीला कसेबसे लिटरला ४ किलोमीटरचे ॲव्हरेज पडते. यातून उत्पन्न २७ रुपये मिळते. सहा रुपयांत खर्च भागवायचा कसा? हा मोठा प्रश्न असल्यानेच सध्या जेवढ्या एसटी साेडल्या आहेत, त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र फेऱ्यांचे नियोजन करणे महामंडळाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत अजिबात शक्य नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले आहे.

चौकट ०२

शाळा ९ वे १२ वी ५ वी ते ८ वी

सुरू असलेल्या शाळा ९७५ १५७६

विद्यार्थी संख्या १ लाख ४४ हजार ९१९ २, ३२ हजार ३५६

Web Title: Students will get the vehicle to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.