आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी आज अभ्यासमंडळाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:12+5:302021-03-04T04:47:12+5:30
कोल्हापूर : बी. ए. भाग तीन (सत्र पाच) या अभ्यासक्रमाच्या ‘मराठ्यांचा राजकीय इतिहास’ या पुस्तकावर आधारित ‘इतिहास सुपर ...
कोल्हापूर : बी. ए. भाग तीन (सत्र पाच) या अभ्यासक्रमाच्या ‘मराठ्यांचा राजकीय इतिहास’ या पुस्तकावर आधारित ‘इतिहास सुपर गाईड’ आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या फडके प्रकाशनवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे केली. त्यावर विद्यापीठातील इतिहास अभ्यासमंडळाची आज, गुरुवारी बैठक होणार आहे.
या प्रकाशनाने शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर करून मराठ्यांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली आहे. महाराणी ताराराणी यांच्याबद्दल एकेरी उल्लेख या पुस्तकामध्ये केला आहे. महापुरुषांचे आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा. याबाबत योग्य ती तज्ज्ञांची समिती नेमावी. या प्रकाशनवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. अन्यथा दि. १० मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेवेळी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी बुधवारी दिला.