संगीताच्या साथीत एकाग्रतेने अभ्यास सचिन जगताप यांचे संशोधन... विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:29 AM2019-02-17T00:29:23+5:302019-02-17T00:30:47+5:30
अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मांडला आहे.
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मांडला आहे. संशोधनाचा हा प्रबंध ते जागतिक परिषदेत मांडणार आहेत.
प्रा. सचिन जगताप हे गेल्या २० वर्षांपासून बासरीवादन करत असून, शास्त्रीय संगीताचे व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारे परिणाम, यावर त्यांचे गेल्या सात वर्षांपासून संशोधन सुरूआहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव लक्षात घेऊन प्रा. जगताप यांनी २०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर प्रयोग केला. त्यांच्या अभिरुचीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला लावले. सकाळी उठल्यानंतर व अभ्यासाला बसण्यापूर्वी १५ मिनिटे अशी त्यांनी या म्युजिक थेरेपीची पद्धत वापरली. त्यानंतर प्रश्नावली भरून घेतली.
यात विद्यार्थ्यांनी संगीत ऐकल्यानंतर शांत, प्रसन्न, पहाटेची निरव शांतता, मनाला स्थिरता, श्रद्धेय शांतता, एकाग्रतेत वाढ, अभ्यास लक्षात राहत असल्याचे अनुभव मांडले आहेत. प्रा. जगताप विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात, कार्यशाळा घेतात. संगीतातून अधिकारी, कर्मचारी यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन, कार्यशीलता वाढविणे, हे प्रात्यक्षिकासह मांडतात. परदेशातही त्यांनी यावर व्याख्याने दिली आहेत.
संगीत ऐकवल्यानंतर सकारात्मकता आणि ऊर्जा वाढली. बासरीवर ठेवायचा माझा बोट लहानपणीच अर्धवट कापला आहे; त्यामुळे त्या बोटाने मला काही करता यायचे नाही; बासरीवादनाला सुरुवात केल्यानंतर एका महिन्यात माझ्या त्या बोटातही ताकद आली आहे. - निकिता वाकडकर, इंटिरिअर डिझायनर पुणे
मी पूर्वी फार चंचल होतो, अभ्यासात लक्ष लागायचे नाही; पण भूप, दुर्गा, सारंग, काफी हे राग ऐकायला लागलो. हे संगीत ऐकल्यानंतर माझ्यातला चंचलपणा कमी झाला आणि स्थिर बसून अभ्यासाची सवय लागली.
- ज्ञानेश रायबागकर, विद्यार्थी प्रॉडक्शन इंजिनिअरिंग