ऊसतोड मशीनमधील पाल्यासाठी अभ्यास गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:22 AM2021-03-06T04:22:02+5:302021-03-06T04:22:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मशीनने तोडणी केलेल्या ऊसात पाल्याचे प्रमाण किती आहे? याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी साखर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : मशीनने तोडणी केलेल्या ऊसात पाल्याचे प्रमाण किती आहे? याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी साखर आयुक्तांनी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. तेरा सदस्य अभ्यास गटामध्ये कारखान्यांच्या प्रतिनिधींचा भरणा अधिक असल्याने शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
मशीनने ऊस तोड केलेल्या शेतकऱ्यांच्या वजनातून ५ टक्के पाल्याची वजावट केली जाते. याविरोधात आंदोलन अंकुशने कायदेशीर मार्गाने विरोध केला होता. त्यानंतर १ टक्का करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले. आता साखर आयुक्तांनी अभ्यास गटाची नेमणूक केली आहे. यामध्ये ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे सुभाष घोडके हे अध्यक्ष राहणार आहेत. त्याचबरोबर ‘व्हीएसआय’चे पी. पी. शिंदे यांच्यासह ‘राजारामबापू’, ‘जवाहर’, ‘सह्याद्री’, ‘पांडुरंग’ या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदस्य म्हणून राहणार आहेत. ‘अंबालिका’ शुगरचे संजीव माने, शेतीतज्ज्ञ पांडुरंग आवाड, रमेश कचरे , संजय खताळ, अजित चौगुले आदी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
यावर, आंदोलन अंकुशने हरकत घेतली असून ५ टक्के कपात कायदेशीर करण्यासाठी आयुक्तांनी उठाठेव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साखर आयुक्तांनी इतकी तत्परता किलोमीटरच्या अंतराप्रमाणे तोडणी वाहतुकीच्या आकारणी बाबतीत का दाखवली नाही?
तोष्णीवाल समितीने अभ्यास करून काढलेले निष्कर्ष व ऊस नियंत्रण मंडळाच्या मान्यतेने २०१७ ला तोडणी वाहतूक सरासरीऐवजी किलोमीटरच्या टप्प्याने आकारावी म्हणून शासन निर्णय काढला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी २०१८ च्या ऊस हंगामापासून करायची होती, मग ती तीन वर्षेे धूळखात का पडून आहे? अशी विचारणा ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे.