धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा
By admin | Published: April 27, 2016 11:52 PM2016-04-27T23:52:54+5:302016-04-28T01:05:09+5:30
देवानंद शिंदे : मुस्लिम मराठी साहित्य संशोधन कें द्राचे उद्घाटन
कोल्हापूर : एकविसाव्या शतकात धर्माबद्दल संशोधन करीत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास अशी साहित्य संशोधन केंद्रे उपयुक्त ठरतील, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.
मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे बुधवारी सुरू करण्यात आलेल्या मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे कार्यकारिणी सदस्य आदिल फरास, कादर मलबारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी आमदार पाशा पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू शिंदे म्हणाले, ‘उर्दू व मराठी या भाषेतील फरकामुळे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात मुस्लिम व अन्य समाजात दरी निर्माण झाली. समाजातील अशा विविध प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी तसेच मुस्लिम समाजातील लेखकांसाठी व्यासपीठ हे संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे समाजिक आयाम नव्याने जोडले जातील. कुराणातील विज्ञान नव्या परिभाषेत मांडण्यासाठी तसेच भाषेचे बंधन तोडून दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी असे केंद्र उपयोगी ठरेल.
श्रीमंत छत्रपती मालोजीराजे म्हणाले, मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व दिशा देण्यासाठी अशा संशोधन केंद्राची भूमिका महत्त्वाची असेल.
खासदार काकडे म्हणाले, केंद्रातील सर्व महत्त्वाच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास देशभरातील संशोधकांसाठी उपयोगी पडतील.
केंद्र समन्वयक प्रा. डॉ. राजेखान शाणेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. मुस्लिम बोर्डिंग हाऊचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
—
मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्रातून दर्जेदार साहित्याची निर्मिती झाल्यास ते शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करू, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिली.