सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 06:19 PM2021-01-05T18:19:14+5:302021-01-05T19:09:25+5:30
Banking Sector kolhapur- जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ले ऑफ नोटीस बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले.
कोल्हापूर : जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ले ऑफ नोटीस बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेत काम बंद ठेवून दिवसभर ठिय्या मारला. प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जय जिंगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
२४ डिसेंबर २०२० रोजी ठेवीदारांच्या हिताविरोधात काम करत असल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला. यामुळे येथील व्यवस्थापानचे सर्व अधिकार संपुष्टात आले. असे असतानाही व्यवस्थापनाने अचानक सोमवारी (दि. ४) जुन्या ५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याची ले ऑफ नोटीस बजावली. यामुळे बँकेतील सर्व कर्मचारी वर्ग आक्रमक झाले.
मंगळवारी सकाळी १० वाजता सर्व कर्मचारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालय येथे जमा होऊन येथील कार्यालय सुरू होऊ न देता कामकाज बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू करू देणार नाही. तातडीने यासंदर्भात बेठक घ्या. कमी केल्यानंतर भरपाईबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.
जास्त पगारवाल्यांना कमी न करता कमी पगार असणाऱ्यांना कमी केले जात असल्याचा आरोप केले. बँकेच्या विस्तारात जुने कर्मचारी राबले आहेत. बँकेच्या अखेरपर्यंत काम करणार असून सर्व ठेवीदारांचे पैसे दिल्याशिवाय बाहेर पडणार नाही, अशी भूमीका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.