सुभाष देसाई यांना फोनवरून पुन्हा धमकी

By admin | Published: April 21, 2016 01:06 AM2016-04-21T01:06:48+5:302016-04-21T01:06:48+5:30

पोलिस यंत्रणा खडबडून जागी

Subhash Desai threatens phone again | सुभाष देसाई यांना फोनवरून पुन्हा धमकी

सुभाष देसाई यांना फोनवरून पुन्हा धमकी

Next

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना निनावी धमकी पत्रापाठोपाठ बुधवारी अज्ञात व्यक्तीने पुन्हा फोनवरून धमकी दिल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.
देसाई यांच्या लँडलाईन नंबरवर ‘आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, तुमच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, त्यांचे आर्थिक नुकसान करताय, हिंदू धर्माची बदनामी करीत सुटलाय हे बरोबर नाही. हे सर्व थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी फोनवर दिली. पोलिस प्रशासनाने या धमकीची गांभीर्याने दखल घेत फोन कुठून आला, त्याची माहिती सायबर सेलकडून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
देसाई यांना ‘सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ््यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसार्इंचे नशीब साथ देईलच असे नाही,’ या आशयाचे धमकीचे निनावी पत्र सोमवारी आल्याने खळबळ उडाली. या पत्राची वरिष्ठ पातळीवर गोपनीय चौकशी सुरू आहे. ‘सनातन’चे काही साधकही पोलिसांच्या रडावर आहेत.
बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास देसाई शिवाजी स्टेडियम येथील सिंहवाणी पब्लिशर्स कार्यालयात बसून होते. यावेळी त्यांच्या समोर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संतोष तेलंग व जमीर शेख बसून होते. या वेळेत त्यांच्या कार्यालयातील लँडलाईन नंबरवर फोन आला.
देसाई यांनी घेतला असता त्यांना कोण बोलताय, अशी विचारणा केली. त्यांनी नाव सांगताच ‘मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, हे थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली.
पोलिसांच्या समोरच फोन झाल्याने देसाई यांनी मला ऐकू कमी येत आहे, तुम्ही माझ्या मित्रांशी बोला, असे सांगून कॉन्स्टेबल तेलंग यांच्याकडे फोन दिला. तेलंग यांनाही ‘तुमच्या मित्रांना सांगा पुजाऱ्यांचा नाद सोडा’ असे सांगून फोन बंद केला.
या प्रकाराची माहिती तेलंग यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना दिली. त्यांनी काही क्षणांतच सायबर सेल विभागाला देसाई यांचा लँडलाईन नंबर देऊन त्यावर आलेल्या नंबर शोधून काढण्यास सांगितले. सायबर सेलने भारत संचार निगम (बीएसएनएल) विभागाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून देसाई यांच्या लँडलाईन नंबरची कॉल डिटेल्सची माहिती मागविली आहेत. देसाई यांच्या कार्यालय व साळोखेनगर येथील निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातही साध्या वेशात पोलिसांचे पथक टेहाळणी करत आहे. त्यांच्या आजूबाजूला कोणी संशयित व्यक्ती फिरतेय काय याची माहिती हे पथक घेत आहे.

पत्रकार सुभाष देसाई यांना आलेल्या धमक्यांची गंभीर दखल जिल्हा पोलिसप्रमुखांनी घेतली आहे. धमकी देणाऱ्यांचा तपास पोलिस प्रशासन युद्धपातळीवर करत आहे. दोषींवर कडक कारवाई होईल.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
माझ्यामुळे दुखावलेल्या कोणीतरी रवी पुजारीचे नाव घेऊन फोन करण्याचा चावटपणा केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा. धमक्यांना मी
घाबरणार नाही.
- सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार
सुभाष देसाई यांना आलेल्या धमकीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू आहे. त्यांना चोवीस तास पोलिस संरक्षण दिले आहे. धमकी देणाऱ्याचा चेहरा लवकरच समोर आणू.
- भारतकुमार राणे,
शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: Subhash Desai threatens phone again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.