(सीडीसाठीचा विषय) राष्ट्रीय महामार्ग अडकला भूसंपादनात, राज्यमार्गाचे दुखणेही वेगळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:48+5:302021-08-20T04:27:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून दोन राष्ट्रीय महामार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात नागपूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून दोन राष्ट्रीय महामार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात नागपूर ते रत्नागिरी व्हाया कोल्हापूर या मार्गाला २०१५मध्ये मंजुरी मिळूनही भूसंपादनाच्या प्रक्रियेतच अजून हा मार्ग अडकला आहे. त्यामुळे कोल्हापूरपासून त्याचे एक इंचाचेदेखील काम सुरु होऊ शकलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग एनएच ४ अर्थात एएच ४७ या मार्गाचे सातारा ते कागल या मार्गावर सहापदरीकरण प्रस्तावित आहे. साताऱ्यापर्यंत कामे सुरु आहेत, पण तेथून पुढे कागलपर्यंत अजून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. याउलट कागल ते बंगलोरपर्यंतच्या सहापदरीची जागा संपादन प्रक्रिया सुरु झाली असून, लवकरच कामाला गती येणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाची अशी परिस्थिती असताना राज्यमार्गांनाही कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. नागरिक आंदोलने करतात, संघटना आवाज उठवतात पण कामाच्या मंजुरीला तीन वर्षे झाली तरी २५ ते ३५ टक्केच कामे झाली आहेत. निपाणी ते देवगड व्हाया दाजीपूर या मार्गासाठी २२० कोटी रुपये मंजूर आहेत. कोरोना, महापूर या कारणांमुळे तीनवेळा मुदतवाढ मिळाली तरी अजून काम ३५ टक्क्यांवरच आहे. हीच परिस्थिती वाशीनाका परिते, गारगोटी, व्हाया चंदगड अडकूर या मार्गाची आहे. यालाही २२० कोटी रुपये मंजूर असले तरी अजूनही काम २६ टक्क्यांवरच आहे. नुसतेच पॅचवर्क करुन कोल्हापूरला कोकण जोडणारे मार्ग वापरले जात आहेत.