विषय समिती सदस्यत्वाचा गुंता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:54 AM2020-01-24T11:54:45+5:302020-01-24T11:56:23+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर सदस्य म्हणून कोण जाणार यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहिल्याने निवडीचा गुंता कायम राहिला आहे.
अर्ज द्या असे सांगूनही प्रशासनाकडे गुरुवार संध्याकाळपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, हा गुंता लवकर न सुटल्यास विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागेल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत सत्ताबदलानंतर रिक्त झालेल्या पंचायत समिती सभापतींच्या १२ आणि पदाधिकाऱ्यांच्या सहा अशा समितीतील १८ जागांवर कोणाची वर्णी लावायची, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे.
या निमित्ताने सलोखा होत नसल्याने प्रशासनाने कायद्याचीच भाषा सुरू केल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून कायदेशीर तरतुदींचा नव्याने अभ्यास केला जात आहे. बुधवारी (दि. २२) दिवसभर यावर काथ्याकूट केल्यानंतर गुरुवारीही यावरच खल सुरू होता. विरोधी सदस्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे याबाबत विचारणा केली.
दरम्यान, दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनात पक्षप्रतोदांसह सत्ताधारी सदस्यांसमवेत सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची एकत्रित बैठक झाली.
यात पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी, ‘१२ पंचायत समित्यांची नावे निश्चित झाली आहेत. ती वगळून उर्वरित सहा जागांसाठीची नावे निश्चित करा,’ असे सुचविले. याला आडसूळ यांनी आक्षेप घेत, ‘असे करता येणार नाही. १८ जागांसाठीच्या सदस्यांची नावे द्या. वेळेत न दिल्यास सर्वसाधारण सभा बोलावून हा विषय मतदानासाठी घेतला जाईल,’ असे सांगितले.
प्रशासनाने बाजू मांडल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी गोटाची स्वतंत्र बैठक झाली. दरम्यान, दुपारी इच्छुक सदस्यांसह कारभारी गटाची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यावर बैठक होऊन यादीवर बराच काथ्याकूट केला गेला; पण प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे सत्ताधारी सदस्यांचा हिरमोड झाला आहे. आता नेत्यांच्या कानांवर हा विषय घालण्याचे कारभाऱ्यांनी ठरविले आहे.