संविधानाच्या अधीन राहून विवेकाचा लढा : दाभोलकर
By admin | Published: August 14, 2016 12:57 AM2016-08-14T00:57:16+5:302016-08-14T00:59:18+5:30
युवा संकल्प परिषद : दाभोलकरांचा मारेकरी न सापडल्याने संताप
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होत आली तरी अजून मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संतापाची भावना मनात असतानाही अहिंसक मार्गाने संविधानाच्या अधीन राहून विवेकाच्या मार्गाने लढा सुरूच ठेवू, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिवाजी विद्यापीठ व महावीर महाविद्यालयातर्फे शनिवारी आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय युवा संकल्प’ परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘अंनिस’चे कपिल मुळे, सीमा पाटील, संजय बनसोडे, राज्य कार्यवाह सुनील स्वामी, सचिव निशांत शिंदे उपस्थित होते.
हिंसा रुजविण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडून युवकांच्या मनात विवेकाचा विचार रुजविण्यासाठी राज्यभर युवा संकल्प परिषद घेण्यात येत आहे, असे दाभोलकर म्हणाले. तत्पूर्वी सकाळी परिषदेचे उद्घाटन ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षस्थानी होते. महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, रमेश वडणगेकर उपस्थित होते. यावेळी लोंढे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य लवटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. (प्रतिनिधी)
‘विवेकवाहिनी’त सहभागी व्हा
समाजात विवेकी विचार रुजविण्यासाठी ‘अंनिस’तर्फे प्रत्येक महाविद्यालयात ‘विवेकवाहिनी’ सुरू केली असून, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले. हिंसेला नकार देत मानवतेचा स्वीकार करीत विकासप्रवाहात जोडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले
पंतप्रधानांना
काळी पत्रे पाठविणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दि. २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तपासयंत्रणेला त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. याचा निषेध म्हणून ‘अंनिस’च्या प्रत्येक गावातील शाखेतर्फे पंतप्रधानांना काळ्या कागदावर लिहिलेली पत्रे पाठविणार आहोत, असे डॉक्टर दाभोलकर म्हणाले.