(नियोजनातील विषय) : नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची ‘डी. एड्‌.’कडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:44+5:302020-12-25T04:19:44+5:30

प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असतानाही त्यांच्या भरतीबाबत गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल पडलेले नाही. त्यातच या ...

(Subject in planning): As there is no job guarantee, students' D. Lessons to Ed | (नियोजनातील विषय) : नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची ‘डी. एड्‌.’कडे पाठ

(नियोजनातील विषय) : नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची ‘डी. एड्‌.’कडे पाठ

Next

प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असतानाही त्यांच्या भरतीबाबत गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल पडलेले नाही. त्यातच या भरतीला पात्र होण्यासाठी बंधनकारक असलेल्या टीईटी परीक्षेची काठीण्य पातळी अधिक असल्याने त्यातील उत्तीर्णतेचे प्रमाण अगदी कमी आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही पुढे नोकरी मिळेलच याची हमी नसल्याने गेल्या सात वर्षांपासून डी. एड्‌. अभ्यासक्रमाला प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४७ डी. एड्‌. महाविद्यालये होती. विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने २९ महाविद्यालये बंद झाली. सध्या मराठी, इंग्रजी, ऊर्दू माध्यमाची १८ महाविद्यालये सुरू असून तेथील एकूण प्रवेश क्षमता १०२७ आहे. त्यापैकी ४८० जागांवर आतापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशाच्या विशेष फेरीतील मुदतीचे दोन दिवस उरले आहेत. त्यात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

गुणवत्ता राखलेल्या महाविद्यालयांत गर्दी

गुणवत्ता कायम राखलेल्या आणि टीईटी, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी आहे. त्यात पेटाळा, कागल (सांगाव रोड), कोतोली येथील महाविद्यालय, सेंट झेवियर्स कॉलेजचा समावेश आहे. येथे शंभर टक्के प्रवेश निश्चित होत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया

डी. एड्‌.चा अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षेचा पाया असून त्यातून अभ्यासाचा विश्लेषणात्मक दृष्टिकोनही विकसित होतो. त्यामुळे शिक्षक होण्यासह स्पर्धा परीक्षेतील यशाच्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांकडे वळावे.

-डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

प्रतिक्रिया

शिक्षक भरती बंदी असल्याने विद्यार्थ्यांचा ‘डी. एड्‌.’कडील कल कमी झाला आहे. या अभ्यासक्रमासह आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असल्याने आणि गुणवत्तेमध्ये तडजोड करत नसल्याने आमच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी आहे.

-एस. एस. संकपाळ, प्राचार्य, डी. एड्‌. कॉलेज, कागल.

प्रतिक्रिया

शिक्षणातून भावी पिढी घडविण्यासाठी डी. एड्‌. अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक होण्यासह स्पर्धा परीक्षेतही करिअर करता येते. डी. एड्‌. झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने भरतीची गती वाढवावी.

-राजलक्ष्मी चंदगडकर, विद्यार्थिनी.

विद्यार्थ्यांचा ‘डी. एड्‌.’कडील कल कमी होण्याची कारणे

शिक्षक भरतीबाबतची संभ्रमावस्था

टीईटी परीक्षेची काठीण्य पातळी अधिक

मागेल त्याला प्रवेश तत्त्वामुळे गुणवत्ता घसरली

रोजगार देणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची उपलब्धता

आकडेवारी दृष्टिक्षेपात

बंद असलेली महाविद्यालये : २९

सध्या सुरू असलेली महाविद्यालये : १८

अनुदानित महाविद्यालये : ६

विनाअनुदानित महाविद्यालये : १२

प्रवेश क्षमता : १०२७

आतापर्यंत झालेले प्रवेश : ४८०

गेल्या दोन वर्षांतील प्रवेशाची स्थिती

सन २०१७-१८ : ५९०

सन २०१८-१९ : ६५०

Web Title: (Subject in planning): As there is no job guarantee, students' D. Lessons to Ed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.