मद्यपी प्राध्यापकाबाबत शिवाजी विद्यापीठाला लेखी अहवाल सादर, कुलगुरू निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:35 PM2024-09-30T15:35:55+5:302024-09-30T15:36:29+5:30
मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतर त्यांना अपशब्द वापरणाऱ्या या प्राध्यापकाला बेदम चोप दिला
कोल्हापूर : मद्यपान करून आल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतर त्यांना अपशब्द वापरणाऱ्या कोल्हापुरातील एका वरिष्ठ प्राध्यापकाला तीन दिवसांपूर्वी सीसीटीव्हीसमोर बेदम चोप दिला होता. याप्रकरणी सुरक्षा विभागाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे लेखी अहवाल दिला आहे. याप्रकरणी कुलगुरुंकडे दिलगिरी व्यक्त करून सुटण्याचा संबंधित प्राध्यापक प्रयत्न करत आहे. दरम्यान, या प्राध्यापक महाशयाच्या अनेक सुरस कथा बाहेर पडत आहेत.
तीन दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयातील या मूळच्या सातारच्या प्राध्यापकाने विद्यापीठ परिसरातील एका बारमध्ये रात्री नेहमीपेक्षा जास्त मद्यपान केले. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर त्यांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकाशी वाद घातला आणि नंतर अपशब्द वापरले. अनेकदा समजावूनही न ऐकल्यामुळे अतिशय वाईट शब्दांत रक्षकांशी बोलणाऱ्या या प्राध्यापक महाशयाला सीसीटीव्हीच्या साक्षीने संतप्त सुरक्षारक्षकांनी बेदम चोप दिला.
विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर सुरक्षा विभागाने राजारामपुरी पोलिसांत यासंदर्भात कळविले. पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडविले. परंतु, या प्रकरणी सुरक्षा विभागाने कुलगुरुंना कल्पना दिली होती. रविवारी सुरक्षा विभागाने यासंदर्भातील लेखी अहवाल प्रशासनाला दिला आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराचा मानकरी
संबंधित प्राध्यापक ज्या महाविद्यालयात तो शिकवितो, तेथे विद्यमान प्राचार्यांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वी चार वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून त्याने काम केले आहे. या काळातील अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. विशेष म्हणजे या प्राध्यापकाने २०२४ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारही स्वीकारलेला आहे.