डॉल्बीचे खटले तत्काळ दाखल करा
By Admin | Published: September 20, 2016 12:57 AM2016-09-20T00:57:22+5:302016-09-20T00:58:31+5:30
प्रदीप देशपांडे : सोळा मंडळांविरोधात भक्कम पुरावे गोळा करावेत
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या मंडळांविरोधात भक्कम पुरावे गोळा करून तत्काळ खटले न्यायालयात दाखल करा, असे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी विशेष पथकास सोमवारी दिले.
देशपांडे यांनी सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर खटले दाखल करण्यासाठी विशेष पथकाकडून माहिती घेतली. निरीक्षक अनिल देशमुख यांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यासाठी ध्वनिक्षेपक मापन यंत्र, व्हिडिओ चित्रीकरण, फोटो, प्रसारमाध्यमातील बातम्यांचा आधार घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार वाघाची तालीम मंडळ (उत्तरेश्वर पेठ), फिरंगाई तालीम मंडळ, बी. जी. एम. स्पोर्टस्, राजे संभाजी तरुण मंडळ (शिवाजी पेठ), पिंटू मिसाळ बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब-सुबराव गवळी तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ (मंगळवार पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ-दयावान ग्रुप (ताराबाई रोड), बाबूजमाल तालीम मंडळ (गुरुवार पेठ, ताराबाई रोड), हिंदवी स्पोर्टस् (ताराबाई रोड), कै. उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉईज, रंकाळवेश तालीम मंडळ (सर्व रंकाळा टॉवर), गणेश तरुण मंडळ (राजारामपुरी १२वी गल्ली), बागल चौक मित्रमंडळ, आदी मंडळांचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. डॉल्बी सिस्टीम लावलेल्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच डॉल्बीचे मालक व चालक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बैठकीस शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अमृत देशमुख, प्रवीण चौगुले, आदींसह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)