‘न्यूट्रीयन्टस’वर दरोड्याचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:44 PM2017-08-14T18:44:13+5:302017-08-14T18:45:31+5:30
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रीयन्टस कंपनीने जिल्हा बँकेच्या ताब्यात साखर परस्पर विक्री करून मोठा गुन्हा केला असून संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करा व त्यांच्याशी केलेला भाडेकरार रद्द करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन सोमवारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना दिले.
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करणाºया व्यक्तीशी संबंधित कंपनीनेच अशी चोरी करणे नामुष्कीजनक असून जो व्यक्ती बँकेत राहून बँकेलाच चुना लावत असेल तर शेतकºयांचे काय कल्याण करणार? असा सवाल करत त्यांच्याशी केलेला भाडेकरार रद्द करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. साखर चोरीप्रकरणी बँकेने पोलिसांत तक्रार दिली आहे, पण केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून या प्रवृत्तीला चाप बसणार नाही. ट्रक लावून राजरोसपणे बँकेच्या मालमत्तेवर दरोडा घातल्याने संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय पवार यांनी केली.
‘दौलत’च्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली होती, हा कारखाना कोणी भाडेतत्त्वावर घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी ‘न्यूट्रीयन्टस’ कंपनीने पुढे येऊन करार केला, त्याप्रमाणे मार्च २०१७ अखेर ३४ कोटी रुपये भरले. त्यानंतर त्यांना आर्थिक अडचणी आल्याने शेतकरी, कामगारांची देणी थकली. आता करार रद्द केला तर ते न्यायालयात जातील आणि कारखानाच बंद पडेल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर खांडेकर, अशोक मनवाडकर, संग्राम अडकूरकर आदी उपस्थित होते.
-
आगामी हंगामाची साशंकताच
शेतकºयांचे ‘एफआरपी’प्रमाणे पैसे न दिल्याने कारखान्याला ऊस कोणी घालतील, अशी आजची परिस्थिती नाही. त्यामुळे कारखाना चालविण्याची त्यांचीच मानसिकता राहणार नसल्याने ते स्वत:च करार रद्द करण्याची शक्यता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
हेपन्नावारांना जरा दाखवणार का?
‘न्यूट्रीयन्टस’चे मालक कोण आहेत? अशी विचारणा करत जरा या प्रकाश हेपन्नावारांना आम्हाला दाखवणार का? अशी विचारणा विजय देवणे यांनी केली. यावर आतापर्यंत ते कधीच बँकेत आलेले नाहीत, त्यांचे कार्यकारी संचालक शिर्के यांच्याशी व्यवहार सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.