‘वारणा’बाबत जनहित याचिका दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:01 AM2019-02-25T01:01:34+5:302019-02-25T01:01:40+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या आज, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत वारणा नळ योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा क्रांतिकारक ठराव करावा, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. याचिका दाखल झाल्यास कुठले दानोळीकर आणि कुठले पुढारी सर्वांच्याच कुरघोड्या बंद होतील, असा टोला देत वारणा योजनेच्या मंजुरीपासून काहीजणांनी टीका केली, तर काहीजणांनी पाण्यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इचलकरंजीकरांनी संयमाची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.
येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिला महोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील ४० ते ५० वर्षे पाणी पुरावे, यासाठी शासनाने वारणा योजना मंजूर केली. मात्र, काहीजणांनी टीका करीत, तर काहीजणांनी राजकारण सुरू केल्याने नदीकाठच्या गावांतून विरोध सुरू झाला. इचलकरंजीवासीयांनी संयमाची भूमिका घेतली. तरीही त्यांचा विरोध कायम आहे. याचा विचार करून सभेमध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी राजकारण पाहिजे, की पाणी पाहिजे, याचा विचार करावा. कारण प्रत्येक गोष्टीत टीका केली जाते. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या हस्तांतरणावर टीका झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बंद अवस्थेत असल्याची टीका झाली. काही महत्त्वाच्या गोष्टीत राजकारण बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, नगराध्यक्षा अलका स्वामी, महिला व बालकल्याण समिती सभापती राजेशकंवर राठोड, आरोग्य सभापती संगीता आलासे, संध्या बनसोडे, अजित जाधव, अशोक जांभळे, मदन झोरे, मालिकेतील कलाकार दीपाली मुचरीकर, गार्गीसिंह उदावत, आदी उपस्थित होते. यावेळी मोनिका जाजू यांनी सूत्रसंचालन केले.
युतीमुळे माने वहिनींमध्ये परिवर्तन
कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना माजी खासदार निवेदिता माने यांनी आमदार हाळवणकर व नगराध्यक्षा स्वामी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. त्यावेळी उपस्थितांत युती झाल्याने कौतुक सुरू असल्याची कुजबुज सुरू होती. तोच धागा पकडून आमदार हाळवणकर यांनी शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे माने वहिनींच्यात परिवर्तन झाल्याचा टोला दिला. त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला.