हद्दवाढीसंदर्भात अहवाल सादर करा
By admin | Published: May 13, 2016 01:02 AM2016-05-13T01:02:02+5:302016-05-13T01:05:09+5:30
मुख्यमंत्र्यांचे आदेश : चंद्रकांतदादांशी चर्चा; निर्णयाच्या दिशेने एक पाऊल पुढे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात नगरविकास विभागाने तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीसंदर्भात चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. सरकारच्या या भूमिकेमुळे शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले.
महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही मागणी करण्यात येत आहे. शहरात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती स्थापन होऊन त्यांच्यामार्फत हद्दवाढीसाठी आंदोलन होत आहे. गेल्याच आठवड्यात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक घेऊन याबाबत सरकार सकारात्मक आहे; परंतु नेमकी कशाप्रकारे हद्दवाढ करावी, त्यामध्ये कोणकोणती गावे असावीत, याकरिता तज्ज्ञ शासकीय अधिकाऱ्यांच्या पाहणी व अभ्यासानंतर निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबईत मंत्रालयात पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन या मागणीवर ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याची विनंती केली.
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना सन १९४४ मध्ये झाली व त्यानंतर सन १९७२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, सन १९४४ ते १९७२ या कालावधीत व त्यानंतरदेखील एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर अनेकदा याबाबत निर्णय घेण्यासाठी आश्वासने देऊन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)
दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती
नगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक समिती नेमून त्यामार्फत अभ्यासपूर्ण अहवाल मागवून घ्यावा आणि त्यानंतर हद्दवाढीवर निर्णय घ्यावा, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती तत्काळ मान्य केली. पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेमुळे शहराची हद्दवाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले.