‘गोकुळ’ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:15+5:302021-04-20T04:25:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्रिया ऑनलाईन पार पडली. पुढील सुनावणी सोमवारी (दि. २६) होणार असून तोपर्यंत संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे. निवडणूक कार्यक्रमात २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी आहे.
‘गोकुळ’ची निवडणुकीची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट वाढत असल्याने निवडणुकीला स्थगिती द्यावी, यासाठी सत्तारूढ गटाच्या वतीने काही संस्थांनी साधारणता महिन्यापूर्वी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर साेमवारी सुनावणी झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात रोज पाचशेपेक्षा अधिक कोराेनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यात दोन दिवसापूर्वी ‘गोकुळ’च्या एका ठराव धारकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याने सत्तारूढ गटाने हाच मुद्दा सर्वाेच्च न्यायालयात लावून धरला. ऑनलाईन सुनावणीमध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकल्या, मात्र यातून ‘गोकुळ’सह अन्य सोळा संस्थांना वगळण्यात आल्याचे ही निदर्शनास आणून दिले.
यावर, सोमवारपर्यंत राज्य सरकारने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, निवडणुकीबाबत सोमवारी सुनावणी होणार असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे.