Kolhapur: हातकणंगलेत गौण खनिज उत्खनन, शासनाचे लाखो रुपये बुडाले; कारवाई अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:25 PM2023-07-17T13:25:20+5:302023-07-17T13:25:37+5:30
महसूल विभाग आणि स्टोन क्रशर चालकांचे साटेलोटे असल्यामुळे शासनाचे लाखो रुपये बुडाल्याचे ईटीएस मोजणीतून समोर आले
दत्ता बीडकर
हातकणंगले : तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची शासन रॉयल्टी ५०० ब्रास आणि उत्खनन हजार ब्रास, हे मोजणीअंती स्पष्ट झाले आहे. महसूल विभाग आणि स्टोन क्रशर चालकांचे साटेलोटे असल्यामुळे शासनाचे लाखो रुपये बुडाल्याचे ईटीएस मोजणीतून समोर आले आहे. या करचोरी प्रकरणाने महसूल यंत्रणा आणि क्रशर चालकांवर कारवाई अटळ बनली आहे. याच्या धास्तीने तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी, अव्वल कारकूनसह अधिकारी यंत्रणा हबकून गेली आहे.
हातकणंगले तालुक्यात असलेल्या दगड खाणी आणि स्टोन क्रशरचालकांकडून जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमावर्ती भागामध्ये दगड, खडी, वाळू, सहसाहित्याचा पुरवठा केला जातो. यासाठी शासनाने क्रेशर मालकांना गायरानमधील जमिनी अटी आणि शर्तीवर गौण खनिज उत्खननासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत.
महसूल यंत्रणेला हाताशी धरून क्रेशर चालकांकडून करचोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. गौण खनिज उत्खनन करण्यासाठी शासनाला ५०० ब्रासची रॉयल्टी भरायची आणि हजार ब्रासचे उत्खनन करायचे असे प्रकार उघड झाले आहेत. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी ही करचुकवेगिरी उघड केली आहे. अवघ्या ४५ दिवसांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रशासनाची छाप गौण खनिज करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध पाडली आहे.
गौण खनिज उत्खननमध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात कर चुकविला जात असल्याचे त्यांनी केलेल्या ईटीएस मोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे. शासनाकडे ५०० ब्रासची रॉयल्टी भरायची अन् उत्खनन मात्र हजारो ब्रास करायचे हे ईटीएस मोजणीद्वारे स्पष्ट झाल्याने सर्व क्रशर चालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्याने तालुक्यात जवळपास दोन लाख ब्रासची सुमारे ४० कोटींची करचुकवेगिरी उघड झाली आहे.
गौण खनिजच्या रॉयल्टी भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी यांचे जागेवरील पंचनामे, त्यांच्या पंचनाम्यानुसार कारकून आणि आणि अधिकारी यांनी मंजूर केलेली रॉयल्टी चलने आणि प्रत्यक्ष कर भरणा ही संपूर्ण यंत्रणा चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यात आल्याने कारवाई अटळ बनली आहे.
गौण खनिजची लाखो रुपयांची करचुकवेगिरी या मोजणी प्रणालीमुळे उघड होणार आहे. कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहेत. महसूल विभागाचे वर्षभराचे उद्दिष्ट या करवसुलीतून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. - सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी, प्रशिक्षाणार्थी तहसीलदार, हातकणंगले