‘एमसॅक्स’चे अनुदान रखडले
By admin | Published: July 22, 2014 10:44 PM2014-07-22T22:44:35+5:302014-07-22T22:49:32+5:30
जिल्ह्यातील परिस्थिती : सामाजिक संस्थांना कामकाज करणे मुश्कील
उचगाव : एमसॅक्सकडून गेल्या चार महिन्यांपासून अनुदान न आल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एड्स जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे. जिल्ह्यात एड्स फैलावत असताना राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्थानावर गेला आहे. अनुदान न आल्याने सामाजिक संस्थांना कामकाज चालवणे कठीण बनले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात युवा विकास संस्था, मुक्ता, मुस्लिम समाज संस्था, नेटवर्क आॅफ पिपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही., एड्स, करुणालय, शिरोळ तालुका मोटार मालक संघ, वारांगना, लोटस मेडिकल फाउंडेशन, मैत्री, आस्था, पीएसआय, महाराष्ट्र नेटवर्क, एनकेपी, सांगली मिशन सोसायटी, दिशा, कोल्हापूर जिल्हा वृत्तपत्रलेखक संघ या सामाजिक संस्थांना एमसॅक्सचे अनुदान मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनुदान रखडले आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार भागविणे सामाजिक संस्थांना शक्य नसल्याने कर्मचारी उसनवारीवर उदरनिर्वाह करीत आहेत.
एड्सला आळा घालण्याकरिता कोल्हापुरात विशेष प्रयत्न चालू आहेत. आजही ऐच्छिक एचआयव्ही तपासणीमध्ये एच.आय.व्ही. पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने व एमसॅक्सच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन अनुदान त्वरित आदा करावे, अशी मागणी सामाजिक संस्थांमधून होत आहे.