उपनगरांचा श्वास गुदमरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:34 AM2017-11-20T00:34:55+5:302017-11-20T00:35:27+5:30
अमर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : वाढती धूळ, जळालेला कचरा, कचरा उठावातील अनियमितता, नालेसफाईअभावी घनकचºयांच्या दुर्गंधीने तुंबलेले नाले, प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे वाढते प्रमाण आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे उपनगरांत राहणाºया नागरिकांत दमा, श्वसनविकार आणि फुप्फुस विकारांत प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, कफ वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे आजार वाढत आहेत. वातावरणातील धूळ व धुराचा लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असल्याने त्यांना
श्वसनाचे गंभीर विकार जडत
आहेत.
धूळप्रवण उपनगरे अशी अलीकडे उपनगरांची नवी ओळख निर्माण होत आहे. निश्चित मानांकाइतके प्रदूषण आता उपनगरांतही वाढत चालल्याने उपनगरांचा श्वास गुदमरतोय. उपनगरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.
धूळ आणि धुरांच्या मिश्रणाने उपनगरवासीयांचा श्वास गुदमरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दमा व श्वसनासंबंधीचे विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर सांगत असले तरी विविध प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
उपनगरांतील मुख्य रस्ते सिमेंट, डांबराचे असले तरी या रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर प्रचंड धूळ उडते. उपनगरांतील बहुतांशी कॉलन्यातील रस्ते विकसित नाहीत. त्यामुळे वाहन जाताच रस्ते धूळप्रवण बनतात. रस्त्यांवरील धूळ हवेत मिसळून नाकावाटे नागरिकांचे श्वसनसंस्थेत प्रवेश करते. सायंकाळच्यावेळी रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर व जड हवा यांच्या मिश्रणाची दाट चादर उपनगरांतील वातावरणात पसरते. श्वसन विकारात खोकला, कफ होणे, श्वास घेण्याचा त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे, आदी गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे.
वाढते प्रदूषण, धकाधकीची जीवनशैली व मानसिक ताण यामुळे दिवसेंदिवस अस्थमाचे रुग्ण वाढत असून, वैशिष्ट्य म्हणजे शाळकरी मुलांना मोठ्या संख्येने अस्थमाने जाळ्यात ओढले आहे. उपनगरांत अनेकांना अस्थमा झाल्याची कल्पनाही नसते. शाळकरी मुलांतील वाढते अस्थमाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अनेक डॉक्टरांचे मत
आहे.
उपनगरातील वातावरणातील प्रदूषणास कारणीभूत ठरणारे कार्बन मोनोआॅक्साईड, सल्फेट नायट्रेटस, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉनचे पार्टीकल कण श्वासाद्वारे श्वसननलिकेत जावून ती लालसर होऊन आकुंचन पावते. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी जागरूकता बाळगणे क्रमप्राप्त
आहे.
वाढलेली वाहनांची संख्या, कचरा उठावातील अनियमिततेने परिसरात पसरणारी दुर्गंधी, घनकचºयांनी तुंबलेले नाले यामुळे उपनगरवासीयांचा श्वास गुदमरतोय. पर्यावरण प्रदूषणप्रश्नी आता नागरिकांनी गंभीर होऊन
सावधगिरीची पावले उचलणे क्रमप्राप्त बनले आहे.
वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण व धूळ मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क किंवा नाकास रुमाल बांधावा. प्रदूषण कमी होण्यासाठी सायकलचा वापर वाढवावा, परिसर स्वच्छतेस प्राधान्य द्यावे.
- डॉ. सुनील चं. बकरे,
सहयोगी प्राध्यापक यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली